तर मग नागपुरातील भिकारी कमी कसे होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 09:01 PM2018-01-08T21:01:58+5:302018-01-08T21:05:32+5:30
मुंबई भिक्षा अधिनियमांतर्गत भीक मागणे हा गुन्हा आहे. त्यामुळे पोलीसांमार्फत भिक्षेकऱ्यांवर कारवाई करण्यात येते. भिक्षेकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी येथेच योजना राबविण्यात आल्यास या सामाजिक गुन्ह्याला अटकाव घालता येऊ शकतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई भिक्षा अधिनियमांतर्गत भीक मागणे गुन्हा असल्यामुळे पोलीस विभागाच्या सामाजिक सुरक्षा पथकाद्वारे रस्त्यावरील भिकाऱ्यांवर कारवाई केली जाते. पोलीस कारवाईकरून भिकाऱ्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर, न्यायालयाच्या आदेशाने त्यांना महिला बाल कल्याण विभागाच्या स्वीकार केंद्रात पाठविण्यात येते. परंतु स्वीकार केंद्रातील कालावधी फारच अत्यल्प असतो. त्यांना पुन्हा न्यायालयाच्या आदेशाने सोडून देण्यात येते. भीक मागणे गुन्हा असल्यामुळे, हा गुन्हा पुन्हा त्याच्याकडून होऊ नये म्हणून भिकाऱ्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. मात्र विदर्भात एकही पुनर्वसन केंद्र नसल्याने, सोडल्यानंतर भिकारी पुन्हा त्याच मार्गाने लागतात.
शहरातील मंदिरात, गुरुद्वाऱ्यात, मस्जिदीसमोर, रस्त्यावर मोठ्या संख्येने भिकारी दिसतात. थंडीच्या मोसमात रात्रीला कुठे आडोशाला, फुटपाथवर शेकोट्या पेटवून भिकारी आपले आयुष्य जगतात. मुंबई भिक्षा अधिनियमांतर्गत भीक मागणे हा गुन्हा आहे. त्यामुळे पोलीसांमार्फत भिक्षेकऱ्यांवर कारवाई करण्यात येते. न्यायालयाच्या आदेशान्वये नागपुरातील पाटणकर चौकातील स्वीकार केंद्रात त्यांना ठेवण्यात येते. स्वीकार केंद्रात त्यांना अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच आरोग्य व त्यांच्या मनोरंजनाच्या सुविधा केंद्रात उपलब्ध आहे. या केंद्रात वर्षाला ६०० ते ७०० भिक्षेकरी येतात. पहिल्यांदा आलेल्या भिक्षेकऱ्याला येथे काऊंसलिंग करण्यात येते. त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन, त्यांच्याकडे सोपविण्यात येते. परंतु येथे भिक्षेकऱ्यांना ठेवण्याचा कालावधी फारच अत्यल्प असतो. बहुतांश भिक्षेकरी येथून सुटल्यानंतर पुन्हा भीक मागायला लागतात. भिक्षेकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी येथेच योजना राबविण्यात आल्यास या सामाजिक गुन्ह्याला अटकाव घालता येऊ शकतो.
पुनर्वसन केंद्र अहमदनगरला
राज्यात मुंबई, पुणे व नागपूर येथे भिक्षेकऱ्यांचे स्वीकार केंद्र आहे. परंतु त्यांचे पुनर्वसन केंद्र हे अहमदनगरला आहे. जे भिक्षेकरी वारंवार कारवाईत सापडतात, त्यांना न्यायालयाच्या आदेशान्वये पुनर्वसन केंद्रात १ ते ३ वर्षासाठी पाठविण्यात येते. या केंद्रात त्यांना शेतीची कामे व स्वावलंबनाचे धडे देण्यात येते. परंतु बहुतांश भिक्षेकरी या केंद्रात जाण्यासच टाळतात. हेच केंद्र जर स्वीकारगृहात असते तर त्याचा परिणाम अधिक प्रभावी झाला असता.
विदर्भात एकमेव स्वीकार केंद्र नागपुरात
प्रत्येक जिल्ह्यात भिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. नागपूर शहरात काही प्रमाणात त्यांच्यावर कारवायाही होतात. परंतु विदर्भातील इतर जिल्ह्यात भिकाऱ्यांवर कारवाया झाल्यातरी, त्यांना सोडून देण्यात येते. कारण कारवाई केल्यानंतर त्याला न्यायालयापुढे हजर करणे, न्यायालयाच्या आदेशानंतर नागपुरातील स्वीकार केंद्रात सोडणे, पुन्हा न्यायालयाच्या तारखेवर त्यांना स्वीकार केंद्रातून घेऊन जाणे, हा त्रास टाळण्यासाठी इतर जिल्ह्यात कारवाईच टाळली जाते. त्यामुळे नागपूरच्या स्वीकार केंद्रात नागपूर शहरातीलच भिकारी मोठ्या प्रमाणात असतात.
नशेच्या आधीन भिकारी
स्वीकार केंद्रात येणारे भिकारी किंवा रस्त्यावर, मंदिरासमोर भीक मागणारे भिकारी हे व्यसनासाठी भीक मागतात. धार्मिक स्थळांवर अन्नदानाचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढल्याने, भिक्षेकऱ्यांना दोन वेळेचे पोट सहज भरता येते. परंतु व्यसनाच्या अधीन असल्यामुळे भिकारी पैशाची भीक मागतात. बरेचदा आपणही अनुभवले असेल, त्यांना अन्न दिल्यास ते नकार देतात आणि पैशाची मागणी करतात. दिवसभर भीक मागून जो काही पैसा गोळा होतो. त्यातून व्यसन करतात. भीक मागणे हा सामाजिक गुन्हा असल्यामुळे भीक मागण्याच्या वृत्तीचा बिमोड करण्यासाठी समाजानेच भीकेच्या रुपात पैसे देऊ नये, असे आवाहन स्वीकार केंद्राचे अधीक्षक एम.एम. कांबळे यांनी केला आहे.