नैसर्गिक आपत्तीत कशी मिळणार आरोग्य सेवा ?
By admin | Published: October 21, 2015 03:37 AM2015-10-21T03:37:19+5:302015-10-21T03:37:19+5:30
शहर वाढत आहे; त्यातुलनेत शहरातील रुग्णालयांची संख्या अपुरी पडत आहे. शहरात सर्व मिळून ६५६ रुग्णालयांमध्ये १० हजार ६४५ खाटांची संख्या आहे.
२३५ नागरिकांमागे केवळ एकच खाट : एकाचवेळी ११ हजारावरील रुग्णांवर उपचार अशक्यच
नागपूर : शहर वाढत आहे; त्यातुलनेत शहरातील रुग्णालयांची संख्या अपुरी पडत आहे. शहरात सर्व मिळून ६५६ रुग्णालयांमध्ये १० हजार ६४५ खाटांची संख्या आहे. २५ लाख लोकसंख्येच्या तुलनेत प्रति २३५ नागरिकांमध्ये १ खाट असे प्रमाण येत आहे. शहरात दुर्दैवाने एखादे नैसर्गिक संकट आले आणि त्यामध्ये ११ हजारावरील नागरिक पीडित झाले तर काय होईल, याची कल्पनाच न केलेली बरी. नागपूर हे स्मार्ट सिटी होईल. यामुळे येथे ‘धन्वंतरीचे पाईक’ रुग्णसेवेसाठी तत्पर असतील, पण सेवा देणार कुठे हाच प्रश्न भविष्यात निर्माण होण्याची शक्यता आहे.
२०११ साली २० लाख लोकसंख्या असलेले नागपूर शहर २५ लाख लोकसंख्येच्या पुढे सरकले आहे. शहरात मनपाचे ३७ दवाखाने, १२ हेल्थ पोस्ट व १० माता-बाल संगोपन केंदे्र आहेत. यातील महापालिकेच्या पाचपावली दवाखान्यात १०, गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात ८० तर इमामवाडा येथील आयसोलेशन दवाखान्यात ४० खाटा अशा एकूण १३० रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था आहे. शहरात तीन शासकीय रुग्णालये महत्त्वाची आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेडिकल) खाटांची संख्या १ हजार ४०० आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेयो) खाटांची संख्या ५९० आहे, तर डागा रुग्णालयात ३३५ खाटांची सोय आहे.
शहरात ६५० खासगी रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये एकूण ८ हजार १९० खाटा उपलब्ध आहेत. मात्र, या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेली आरोग्यसेवा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची आहे. त्यामुळे खासगी रुग्णांलयांमध्येही आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव खाटांची संख्या कशी वाढविता येईल, सामान्यांनाही कमी खर्चात दर्जेदार आरोग्य सेवेचा लाभ कसा मिळवून देता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
३८ हेल्थ पोस्टची आवश्यकता
५० हजार लोकसंख्येमागे एक हेल्थ पोस्ट असावे, असे शासनाचे प्रमाण आहे. महापालिकेचे १२ हेल्थ पोस्ट आहेत. आणखी ३८ हेल्थ पोस्टची शहराला गरज आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची गरज आहे, मात्र शासनाचे अद्यापही याकडे लक्ष नाही.
प्रत्येक मतदारसंघात हवे
दोन हजार रुग्णक्षमतेचे रुग्णालय
१९८५ च्या तुलनेत सध्या शहराचा विस्तार चारही दिशेने झाला आहे. १५ लाख लोकसंख्या असलेले हे शहर ३० लाखांच्यावर गेले आहे. यातील सुमारे चार लाख नागरिक शहरातील रेल्वे स्टेशन, बसस्थानकातून दररोज ये-जा करतात. शहरात सहा विधानसभा मतदारसंघ झाले. प्रत्येक मतदारसंघात अडीच लाखांच्या आसपास मतदार आहेत. यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये दोन हजार रुग्णक्षमता असलेल्या रुग्णालयाची गरज आहे. शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांवर नजर टाकल्यास एकाही रुग्णालयात अत्याधुनिक सोई नाहीत. येथील रुग्णालयाची भिस्त जुन्याच सोर्इंवर आहे. यातच मेयो आणि मेडिकल रुग्णालयाचे वाढलेले शुल्क, औषधांचा तुटवडा, कमी मनुष्यबळ व सोर्इंचा अभाव असल्याने गरीब रुग्णांचे हाल होत आहेत.