माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला जास्त गुण कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:11 AM2021-08-25T04:11:18+5:302021-08-25T04:11:18+5:30
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. त्यामुळे राज्याचा निकाल ऐतिहासिक ...
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. त्यामुळे राज्याचा निकाल ऐतिहासिक लागला. काही शाळांनी गुणदान करताना विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार गुणदान केले. त्यामुळे माझ्या मुलाला कमी गुण का दिले, अशी ओरड पालकांची होत आहे. दुसऱ्या शाळेने माझ्यापेक्षा कमी हुशार असलेल्या मित्राला चांगले गुण दिले. मला का कमी मिळाले, अशी ओरड विद्यार्थ्यांची आहे. हुशार विद्यार्थ्यांनी परीक्षा झाल्या असत्या तर जास्त गुण मिळाले असते, असेही मत व्यक्त केले आहे.
- दृष्टिक्षेपात
दहावीचे विद्यार्थी - ६२,६४७
पास झालेले - ६२,२००
बारावीचे विद्यार्थी - ५६,६६७
पास झालेले - ५६,४५०
- कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घरी बसून ऑनलाईन शिक्षण घेतले. वेळ भरपूर असल्यामुळे विद्यार्थ्यांनी कसून अभ्यास केला होता. या काळात अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले होते. परंतु परीक्षा रद्द झाल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे.
- राजकुमार पाटील, पालक
- आमचे संपूर्ण वर्ष ऑनलाईनमध्ये गेले. परीक्षाही झाल्या नाही. पण आम्ही अभ्यास भरपूर केला. परीक्षा झाली असती तर यापेक्षा जास्त गुण मिळाले असते.
रागिणी खाडे, विद्यार्थिनी
- बारावीचे मूल्यांकन हे दहावी व अकरावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे झाले. दहावीत पहिल्या श्रेणीत आलो होतो. पण अकरावीला फार गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे गुण कमी पडले होते. पण बारावीला भरपूर अभ्यास केला होता. अपेक्षा होती की, ८० टक्क्यावर गुण मिळेल. पण कमी मार्क पडले. परीक्षा झाली असती तर नक्कीच अपेक्षित गुण मिळाले असते.
सुहास ठाकरे, विद्यार्थी
- परीक्षा नाही, मूल्यांकन नाही
दरवर्षी परीक्षा झाल्यानंतर निकाल हाती आल्यावर ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला अपेक्षित गुण मिळाले नाही ते विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी बोर्डाकडे अर्ज करतात. विशेष म्हणजे बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनासाठी भरपूर अर्ज असतात. परंतु यावेळी बोर्डाने पुनर्मूल्यांकनाची सोय उपलब्ध करून दिली नाही. शाळेने जे गुणदान केले, त्याच आधारावर निकाल घोषित केला आहे. त्यात नाराज असलेल्या विद्यार्थ्यांची गोची झाली आहे.
- हो विद्यार्थ्यांची व पालकांची नाराजी आम्हाला सहन करावी लागत आहे. त्या शाळेने माझ्या मुलापेक्षा कमी हुशार असलेल्या मुलाला जास्त गुण दिले. तुम्हाला जास्त गुण द्यायला काय झाले होते, अशी ओरड विद्यार्थी व पालकांकडून होत आहे. पुढचे शिक्षण आता आम्हाला तुमच्या शाळेत शिकवायचे नाही, असाही त्रागा पालक करीत आहेत. वास्तविक आम्ही विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार गुणदान केले आहे. खरे तर अशी ओरड करणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी शासनाने सीईटी अनिवार्य करायला हवी होती. ग्रामीण भागातील आमच्यासारख्या प्रामाणिक शाळेतील शिक्षकांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे.
राजश्री उखरे, प्राचार्य