‘पापा टेन्शन मत लो, मै ठिक हूं’, म्हणणाऱ्या मुलीचा मृत्यू होतोच कसा?, वडिलांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 01:03 PM2023-07-07T13:03:20+5:302023-07-07T13:06:44+5:30
अख्खे नर्सिंग कॉलेज हळहळले
नागपूर : बुधवारी सकाळी शितलने वडील राजकुमार यांना फोन करून बरे वाटत नसल्याचे सांगितले. मेडिकलमध्ये भरती होत असल्याचीही माहिती दिली. परंतु ‘पापा टेन्शन मत लो, मै ठिक हूं’, असे सकाळी म्हणणाऱ्या मुलीचा रात्री मृत्यू होतोच कसा, असा प्रश्न तिच्या वडिलांनी उपस्थित केला. जम्मू काश्मीरहून नागपूरला आलेल्या आई, वडील आणि छोट्या भावाला अश्रू आवरणेही कठीण झाले होते.
शितल जम्मू काश्मीरमधील. त्यातच तिचा मनमिळावू स्वभाव. यामुळे तिची मैत्री अंतिम वर्षातील विद्यार्थिनीसोबतही होती. बुधवारी रात्री अचानक झालेल्या तिच्या मृत्यूने अख्खे कॉलेज हळहळले. जम्मू काश्मीरमधून तिचे आई-वडिल आणि छोट्या भावाने कसेतरी करून गुरुवारी नागपूर गाठले. संपूर्ण प्रवास त्यांचा हुंदके देत गेला. नागपूरला आल्यावर ते शवविच्छेदन गृहाच्या बाहेर रडत बसले होते. त्यांना सांभाळण्यासाठी नर्सिंग कॉलेजचे शिक्षक आणि विद्यार्थी होते. वडील राजकुमार यांना बोलते केल्यावर ते म्हणाले, ५ जुलै रोजी शितलचा फोन आला. तेव्हा ती भरती होत असल्याचे सांगत ‘टेन्शन’ न घेण्यासही सांगितले. परंतु मुलीच्या आवाजात झालेला बदल आम्हाला जाणवला. आम्ही जम्मू काश्मीरमधून नागपूरला येण्याच्या तयारीला लागलो. परंतु रात्रीच तिच्या मृत्यूची माहिती मिळाली. आम्ही लगेच नागपूरसाठी निघालो.
जम्मू-काश्मीरच्या नर्सिंग विद्यार्थिनीचा नागपूर मेडिकलमध्ये मृत्यू
- शिक्षक, विद्यार्थी सर्वच रडले
शवविच्छेदनानंतर शितलचा मृतदेह नर्सिंग कॉलेजमध्ये आणण्यात आला. तेव्हा मोठ्या संख्येत नर्सिंग विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. दोन मिनिटे श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी शिक्षकांसोबतच उपस्थित सर्व विद्यार्थी हुंदके देत होते. उपस्थित प्रत्येक जण रडत होता.
- मदतीसाठी अनेकांचे हात आले पुढे
शितलचे वडील शेतकरी. जम्मू काश्मीरला मुलीचा मृतदेह कसा न्यावा, हा त्यांचासमोर प्रश्न होता. त्यावेळी कॉलेजचे शिक्षक व नर्सिंग संघटनेचे कार्यकर्ते सरसावले. त्यांनी रुग्णवाहिकेतून जम्मू काश्मीरला मृतदेह नेण्याची सोय उभी केली. सायंकाळी ६ वाजता तिच्या नागपूर-जम्मू काश्मीरच्या अखेरच्या प्रवासाला सुरुवात झाली.
- वसतिगृहातील विद्यार्थी वाऱ्यावर!
बी.एस्सी. नर्सिंग कॉलेजला २०० विद्यार्थी असून एम.एस्सी. नर्सिंग कॉलेजला ५० विद्यार्थी आहेत. यातील जवळपास १५ टक्के विद्यार्थी हे महाराष्ट्र बाहेरील आहेत. मुला-मुलींच्या वसतिगृहात वॉर्डन नाही. स्वच्छ पाण्याची सोय नाही. स्वच्छतागृहाची सफाई होत नाही. सर्वत्र घाण व झुडुपांमुळे साप कधी कुठून निघेल याची भीती राहते. त्यात महिन्याभरापासून वाढलेल्या डासांच्या प्रादुर्भावामुळे कधी कोणता आजार होईल, याचा नेम नसल्याचा विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. आम्हाला वाऱ्यावर सोडण्यात आल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.