दहावी, बारावीचा अभ्यासक्रम कसा करणार पूर्ण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 11:25 AM2021-01-23T11:25:43+5:302021-01-23T11:27:19+5:30
Nagpur News दहावी आणि बारावीला शिकविणारे शिक्षक व विद्यार्थी अभ्यासक्रम कसा पूर्ण होईल, या गोंधळात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहावी आणि बारावीचे महत्त्वाचे वर्ष असल्याने शिक्षण विभागाने नववी ते बारावी वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नागपूर जिल्ह्यात १४ डिसेंबरपासून, तर महापालिकेच्या हद्दीतील शाळा ४ जानेवारीपासून सुरू झाल्या. अजूनही शाळांमध्ये ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती नाही. एकीकडे परीक्षा तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. शासनाने अभ्यासक्रमात २५ टक्के कपात केली असली तरी, ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्यास साधारणत: साडेतीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीला शिकविणारे शिक्षक व विद्यार्थी अभ्यासक्रम कसा पूर्ण होईल, या गोंधळात आहेत.
कोरोनामुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. त्यामुळे जुलै महिन्यामध्ये शासनाने ऑनलाइन शिक्षणावर जोर दिला. पण ग्रामीण भागात ऑनलाइनच्या समस्या असल्याने अपेक्षित अभ्यासक्रम शिकविला गेला नाही. १४ डिसेंबरपासून शाळा सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने जिल्ह्यात अभ्यासाला सुरुवात झाली. यंदा ७५ टक्के अभ्यासक्रमावरच पेपर निघणार आहे. पण ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करायलाही साडेतीन महिन्यांच्यावर कालावधी लागतो आहे. त्यामुळे यावर्षी शिक्षक केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर देत आहे. मुलांची रिव्हिजन, प्रॅक्टिकल कसे घेणार हा प्रश्नच आहे. शहरामध्ये काही नामांकित शाळांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लासेस जुलै महिन्यापासूनच सुरू केले होते. त्यामुळे त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पूर्ण झाले असून, आता ते विद्यार्थ्यांकडून रिव्हिजन करवून घेत आहे. सोबतच प्रॅक्टिकलची तयारी करीत आहेत.
- आम्ही जुलैमध्ये ऑनलाइन क्लासेस सुरू केले. डिसेंबरमध्ये आमचा अभ्यासक्रम संपला. आता आम्ही रिव्हिजन व प्रॅक्टिकलवर फोकस करीत आहे. आमच्या विद्यार्थ्यांना भरपूर वेळ मिळणार असल्याने परीक्षेचे टेन्शन नाही.
अर्चना डाखोळे, प्राचार्य, सोमलवार हायस्कूल
- ७५ टक्के संपूर्ण अभ्यासक्रम अपेक्षित वेळेत पूर्ण होऊ शकत नाही. अभ्यासक्रम कुठून सुरू करायचा, असा प्रश्न पडतो आहे. अभ्यासक्रम कमी केला असला तरी, संपूर्ण धडे अभ्यासाचे आहे. धड्यातील एक भाग कमी केला आहे. अजूनही उपस्थिती ५० टक्क्यांवर नाही. ऑनलाइन ऑफलाइन दोन्ही वर्ग शिकविणे शक्य नाही. विद्यार्थी गोंधळलेल्या मन:स्थितीत आहे.
- डॉ.अशोक गव्हाणकर, प्राचार्य
- महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभाग गप्पगार बसला आहे. २०२१ सत्रातील परीक्षेचा अभ्यासक्रम व प्रात्यक्षिक याबद्दल दिशानिर्देश स्पष्ट नाही, वेळापत्रक नाही, परीक्षा केंद्रावरील व्यवस्था व नियोजन अस्पष्ट आहे. जानेवारी महिना अर्धा लोटला तरीही संथ गतीने शिक्षण विभागाची कार्यपद्धती ही चिंता वाढविणारी बाब आहे.
प्रा. सपन नेहरोत्रा
- आमच्या शाळेने दहावीच्या विद्यार्थ्यांवर सुरुवातीपासूनच फोकस केले. ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षक सातत्याने संपर्कात होते. शाळेच्या पुढाकारामुळे आम्ही अभ्यासात खंड पडू दिला नाही. आमचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. आता आमची रिव्हिजन सुरू आहे.
अखिलेश डांगे, शहरी विद्यार्थी
- ग्रामीण भागात ऑक्टोबर महिन्यापर्यंत शाळांनी गांभीर्याने घेतलेच नाही. ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण शक्यच नव्हते. डिसेंबर महिन्यात शाळा सुरू झाली आहे. ७५ टक्के अभ्यासक्रम तीन महिन्यात शक्य नाही. आमचा केवळ अभ्यासक्रम पूर्ण होणार आहे. परीक्षेची तयारी नाही. ग्रामीण भागातील परिस्थितीचे आकलन करून किमान ५० टक्के अभ्यासक्रमावरच पेपर घ्यावेत.
नीलेश कारोकार, ग्रामीण विद्यार्थी