नागपुरातील हिवाळी अधिवेशन काळात कोरोना टेस्टिंगचे गणित कसे जमविणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 10:18 AM2020-10-14T10:18:48+5:302020-10-14T10:21:57+5:30
Nagpur News Corona winter session अद्यापही कोरोनावर नियंत्रण मिळालेले नसताना नागपुरातील हिवाळी अधिवेशन काळात विधिमंडळ परिसराला कोरोनामुक्त ठेवण्याचे मोठे आव्हान राहणार आहे.
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. अद्यापही कोरोनावर नियंत्रण मिळालेले नसताना विधिमंडळ परिसराला कोरोनामुक्त ठेवण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. परिसराच्या आत येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी करावी लागणार आहे. अशा स्थितीत विधिमंडळातच हजारो किट्स लागून जातील. अगोदरच अपुऱ्या किट्सअभावी चाचण्या वाढू शकलेल्या नाहीत. अशा स्थितीत जनतेच्या चाचण्यावर अधिवेशनकाळात प्रभाव पडण्याची शक्यता आहे.
मुंबईमध्ये दोन दिवसाचे अधिवेशन झाले व त्यात प्रत्येक पासधारकाची चाचणी करण्यात आली. त्यात मंत्री, आमदार, स्वीय सहायक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांचा समावेश होता. ५० हून अधिक लोक त्यात पॉझिटिव्हदेखील आढळले होते. नागपुरातील अधिवेशन हे कमीत कमी एक आठवडा तरी चालविण्याचा विचार सुरू आहे. एखाद्या व्यक्तीची पास देताना एकदाच चाचणी करणे पुरेसे ठरणार नाही. संपूर्णपणे कोरोनामुक्त परिसर ठेवायचा असेल तर परिसरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची दररोज चाचणी करणे आवश्यक ठरणार आहे. जर एकदा जरी चाचणी केली तरी हजारो किट्स लागतील आणि जर दररोज चाचणीचा निर्णय झाला तर ही संख्या आणखी वाढेल.
नागपुरात अजूनही दैनंदिन चाचण्यांची संख्या सात हजारांच्या पुढे गेलेली नाही. अशा स्थितीत अधिवेशन काळात या अतिरिक्त किट्सचे गणित जमविणार कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वैद्यकीय मनुष्यबळ कुठून आणणार ?
आजच्या स्थितीत राज्यभरात कोरोनाची दहशत कायम आहे. प्रत्येक ठिकाणीच वैद्यकीय मनुष्यबळ कमी पडत आहे. उपराजधानीतदेखील हीच स्थिती आहे. अधिवेशन काळात चाचण्यांसाठीदेखील मनुष्यबळ लागेल. बाहेरील शहरांतून वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी बोलविले तर संबंधित ठिकाणी अडचण निर्माण होईल. नागपुरातील यंत्रणा अधिवेशनात राबविली तर येथील आरोग्य व्यवस्था कोलमडेल. त्यामुळे अतिरिक्त वैद्यकीय मनुष्यबळ आणणार कुठून हे शासनाला निश्चित करावे लागणार आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी आरोग्य उपसंचालक डॉ.संजय जयस्वाल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.