किती ही क्रूरता... नऊ महिन्यांच्या बाळाला मारहाण, दिवसा झोपू नये म्हणून काढायची चिमटे
By योगेश पांडे | Published: April 30, 2024 12:32 AM2024-04-30T00:32:56+5:302024-04-30T00:33:19+5:30
बाळाला सांभाळणाऱ्या तरुणीविरोधात गुन्हा दाखल
नागपूर : घर आणि करिअर सांभाळताना मुलाबाळांकडे दुर्लक्ष व्हायला नको म्हणून खाजगी कंपनीच्या माध्यमातून बाई कामावर ठेवणे एका महिलेसाठी मन:स्ताप देणारेच ठरले. आईने बाळ दुसऱ्या खोलीत घेऊन जावे यासाठी संबंधित तरुणीने चक्क नऊ महिन्यांच्या बाळाला मारहाण केली. आपली स्वत:ची रात्रीची झोपमोड होऊ नये व दिवसा बाळ झोपू नये यासाठी ती त्याला चिमटेदेखील काढायची अशी धक्कादायक बाबदेखील समोर आली आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
तक्रारदार महिला गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते व दोघेही नवराबायको नोकरी करतात. तिला ९ महिन्यांचा मुलगा असून त्याला सांभाळण्यासाठी तिने डी.सी.सी. नावाच्या कंपनीच्या माध्यमातून एका तरुणीला कामावर ठेवले. तिच्याकडे एकूण दोन तरुणी कामावर होत्या. त्यातील अंकिता ही बाळाला सांभाळायची तर दुसरी तरुणी घरची कामे करायची. दोघीही २४ तास महिलेकडेच रहायच्या. २५ एप्रिल रोजी महिलेला दुसऱ्या खोलीतून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. ती तिथे गेली असता अंकिता त्याला मारत होती. महिलेने तिला जाब विचारला असता मी मारलेच नाही अशी अंकिताने भूमिका घेतली.
बाळाच्या पाठ व पायावर मारल्याच्या खुणा होत्या. त्यानंतर महिलेने डी.सी.सी. कंपनीला फोन करून या प्रकाराची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी कंपनीचे प्रतिनिधी येऊन तरुणीला घेऊन गेले. महिलेने सोनालीकडे चौकशी केली असता अंकिता दिवसा बाळाला चिमटे काढायची व त्याला मारायची अशी माहिती तिने दिली. रात्री बाळ झोपले पाहिजे यासाठी दिवसा त्याला झोपू द्यायचे नाही असे अंकिता म्हणायची. त्यामुळेच बाळ दुपारी झोपले की चिमटे काढून त्याला ती उठवायची.
हा प्रकार ऐकल्यावर महिलेला धक्काच बसला व तिने गिट्टीखदान पोलीस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरून अंकिता नावाच्या तरुणीविरोधात अल्पवयीन न्याय कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.