नागपुरात कोरोनाचे रुग्ण रुग्णालयातून घरी कसे गेले? मेयोचा गलथानपणा उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 03:13 PM2020-03-14T15:13:24+5:302020-03-14T15:13:50+5:30
मेयोमधून कोरानाचे संशयीत रुग्ण निघून गेल्याच्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. याची खबरदारी म्हणून कोराना पॉझिटीव्ह रुग्ण असलेल्या वॉर्डाबाहेर पोलीस तैनात करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला महारोगाईची घोषणा केली आहे. परंतु इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) यांचे गांभीर्य कळले नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी रात्री १०.३० ते १२ वाजताच्या सुमारास तब्बल चार कोरोना संशयीत रुग्ण रुग्णालयातून निघून गेल्याची खळबळजनक घटना घडली. रात्री उशीरापर्यंत या रुग्णांचा शोधाशोध सुरू होता. शनिवारी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना पत्रपरिषद घेऊन या प्रकरणावर पडदा टाकण्याची वेळ आली.
कोरोना विषाणूची लागण झालेल्या व संशयित रुग्णांसाठी मेयोकडे एकच वॉर्ड आहे. २० खाटांचा या वॉर्डात सध्या एक ४५ वर्षीय पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. शुक्रवारी एकूण सात संशयित रुग्ण दाखल झाले होते. त्याच्यापैकी दोन रुग्ण सकाळी वॉर्डात भरती झाले होते, तर उर्वरीत पाच संशयित रुग्ण सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या दरम्यान वॉर्डात आले. सकाळी आलेल्या दोन रुग्णांचे नमुने त्याचवेळी घेतल्याने रात्री ९ वाजता अहवाल आला. दोन्ही रुग्ण निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी जाऊ दिले. संशयित पाच रुग्णांचे नमुने सायंकाळी घेतल्याने त्यांचे नमुने रात्री उशीरा किंवा दुसऱ्या दिवशी येण्याची शक्यता होती. परंतु दोन रुग्णांना सुटी दिली आम्हाला का नाही, असे म्हणून तेथील डॉक्टरांशी वाद घातला. रात्री १०.३० ते १२ वाजताच्या सुमारास यातील चार संशयीत रुग्ण कुणाला न सांगता रुग्णालयातून बाहेर पडले. यात ३६ वर्षीय महिला नेदरलँड येथून प्रवास करून आली होती. तिच्यासोबत चार वर्षाचा मुलगा आहे. या मुलाला सर्दी-खोकला असल्याने ती मेयोमध्ये आली होती. दुसरा संशयित रुग्ण हा ५० वर्षीय आहे. तो थायलँडला जाऊन आला होता. तर इतर दोन संशयितापैकी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा १९ वर्षीय विद्यार्थी तर दुसरी ६० वर्षीय महिला असून ती कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या घरी स्वयंपाकी म्हणून कामाला आहे. अचानक हे चारही रुग्ण कुणाला न सांगताच रुग्णालयातून निघून गेल्याचे डॉक्टरांना कळताच त्यांनी याची माहिती वरीष्ठ डॉक्टरांना दिली. पोलिसांकडे या विषयी तक्रार करण्यात आली. या चारही संशयितांचे पत्ते व मोबाईल नंबर मेयोकडे असल्याने पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला. परंतु त्यांनी वॉर्डात पॉझिटिव्ह रुग्ण आहे, आम्हालाही कोरोना विषाणूची लागण होऊ शकते, असे सांगून त्यांनी रुग्णालयात येण्यास नकार दिला. पोलिसांनी त्यांना घरीच थांबण्याचा सूचना केल्यात. शनिवारी सकाळी ही घटना बाहेर येताच, मेयोमध्ये सुरू असलेल्या दुर्लक्षितपणा उघड झाला. दोन रुग्णांची बाहेर देशातून प्रवास करण्याची पार्श्वभूमी असताना तर एक महिला पॉझिटीव्ह रुग्णाची घरी काम करीत असतानाही या संशयितांकडे लक्ष का देण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चार पैकी तीन रुग्ण परत आले
मेयोमधून निघून गेलेल्या त्या कोरोना संशयित चार रुग्णांशी रुग्णालय प्रशासनाने संपर्क साधला असून त्यापैकी तीन रुग्णांशी रुग्णालयात परत आले आहेत. एक रुग्ण सायंकाळपर्यंत परत येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी त्यांच्यासोबत मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया उपस्थित होते. जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले की, त्या चार कोरोना संशयित पैकी तिघांना कुठलेही लक्षणे नाहीत. त्यांचे रिपोर्ट यायला खूप उशिर झाला होता. तसेच त्या रुग्णांच्या कुटुंबियांच्या काही व्यक्तिगत कामे होती. दरम्यान त्यांच्याशिवाय इतर काही रुग्णांचे रिपोर्ट आले, ते निगेटिव्ह आल्याने ते घरी जायला निघाले. त्यांच्यासोबतच हे चार जणही निघून गेले.रुग्णालय प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क साधला असून त्यांना परत बोलावले आहे. त्यापैकी तिघे जण रुग्णालयात पोहोचलेही. तर एक जण सायंकाळपर्यंत येणार आहे. या चौघांचे रिपोर्ट सायंकाळपर्यंत येतील.
कोराना पॉझिटिव्ह रुग्णाच्या वॉर्डाबाहेर पोलीस तैनात करणार
मेयोमधून कोरानाचे संशयीत रुग्ण निघून गेल्याच्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. याची खबरदारी म्हणून कोराना पॉझिटीव्ह रुग्ण असलेल्या वॉर्डाबाहेर पोलीस तैनात करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी ठाकरे यांनी ही माहिती दिली.