खापरीत हाेणारा प्रकल्प अजनीत कसा वळला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 12:21 PM2020-12-17T12:21:24+5:302020-12-17T12:22:35+5:30
Nagpur News राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे (एनएचएआय) प्रस्तावित इंटर माॅडेल स्टेशन (आयएमएस) बाबत धक्कादायक माहिती समाेर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे (एनएचएआय) प्रस्तावित इंटर माॅडेल स्टेशन (आयएमएस) बाबत धक्कादायक माहिती समाेर आली आहे. एनएचएआयने २०१७ साली प्रकल्पासाठी खापरी आणि जेल राेड परिसर अशा दाेन जागा निर्धारित करण्यात आल्या हाेत्या व एका हाॅटेलमध्ये भूमिपूजनही करण्यात आले हाेते. मात्र दाेन वर्षात प्रकल्पाची जागा बदलून अजनी रेल्वे काॅलनी करण्यात आल्याने संशय निर्माण हाेत आहे. विशेष म्हणजे ५० एकरात प्रस्तावित असलेला माॅडेल स्टेशन प्रकल्प ४४० एकरापर्यंत वाढला कसा, हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अजनीतील वृक्षताेडीविराेधात लढा देणाऱ्या एका वन्यप्रेमी कार्यकर्त्याने एनएचएआयद्वारे काढलेल्या कंत्राटाचे १३८ पानी दस्तावेज सादर करीत खुलासा केला. नागपूरसह वाराणसी येथे आयएमएस साकार करण्यासाठी सल्लागार नियुक्तीचे हे कंत्राट हाेते. संस्थेने २०१७ साली सल्लागार नियुक्तीसाठी टेंडर काढले हाेते. यामध्ये जेल राेड परिसर किंवा खापरी स्टेशन येथे ४० ते ५० एकरमध्ये माॅडेल स्टेशन बनविण्याचे प्रस्तावित हाेते. त्यानंतर सल्लागाराच्या अहवालानुसार २०१८ साली तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत प्रकल्पाचे भूमिपूजनही पार पडले. माहितीनुसार कामाचे कंत्राट काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली हाेती. मात्र २०१९ मध्ये रेल्वेशी करार करून अचानक प्रकल्पाची जागा बदलून ताे अजनी रेल्वे काॅलनी परिसरात करण्याचे घाेषित करण्यात आले. एवढेच नाही तर ५० एकरात हाेणाऱ्या प्रकल्पाचे क्षेत्र वाढून ते ४४० एकरावर पाेहचले. अचानक जागा बदलल्याने यामध्ये काही गाैडबंगाल तर नाही ना, असा संशय वन्यप्रेमी कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
तरुणांची रस्त्यावर जनजागृती
दरम्यान, प्रस्तावित प्रकल्पासाठी हजाराे झाडांची हाेणारी कत्तल थांबविण्यासाठी पर्यावरणप्रेमी तरुणांनी साेशल मीडियासह रस्त्यावरही माेहीम छेडली आहे. अजनी काॅलनी परिसरात हे तरुण दरराेज रस्त्यावर उभे राहत हातात बॅनर, पाेस्टर घेऊन लाेकांना जागृत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अजनी वन वाचविण्याचे आवाहन करीत आहेत. बुधवारीही कुणाल माैर्य या तरुणाच्या नेतृत्वात रेल्वे पुलासमाेर उभे राहून लाेकांना जागृत करण्यासाठी माेहीम चालविली.