जिवंत काडतुसे रेल्वेच्या मेन्टेनन्स विभागात गेले कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 09:36 PM2019-03-19T21:36:25+5:302019-03-19T21:37:15+5:30
इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाच्या ७ व्या बटालियनचे जवान लखनौ येथून विजयवाडा येथे २१ नोव्हेंबरला जाताना ते ९ एम.एम.चे ५६९ काडतुसे विसरले होते. यातील ४६४ काडतुसे सापडल्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी ते परत केले होते. मात्र, उर्वरित काडतुसे सोमवारी रेल्वेच्या मेन्टेनन्स विभागात आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. या विभागात ही काडतुसे गेले कसे, याची विचारणा अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, लोहमार्ग पोलीस अधीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या सहायक सुरक्षा आयुक्तांनी मंगळवारी संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांना केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाच्या ७ व्या बटालियनचे जवान लखनौ येथून विजयवाडा येथे २१ नोव्हेंबरला जाताना ते ९ एम.एम.चे ५६९ काडतुसे विसरले होते. यातील ४६४ काडतुसे सापडल्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी ते परत केले होते. मात्र, उर्वरित काडतुसे सोमवारी रेल्वेच्या मेन्टेनन्स विभागात आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. या विभागात ही काडतुसे गेले कसे, याची विचारणा अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, लोहमार्ग पोलीस अधीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या सहायक सुरक्षा आयुक्तांनी मंगळवारी संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांना केली.
सोमवारी १८ मार्चला दुपारी ३ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरील मेन्टेनन्स विभागाच्या बैठक खोलीत खर्ड्याच्या तीन बॉक्समध्ये ९ एम.एम.चे ९८ जिवंत काडतुसे आढळले. येथील कंत्राटी कर्मचारी लीलाधर राऊत (३७) रा. मानकापूर, सादिकाबाद हा खोली साफ करत असताना त्याला हे जिवंत काडतुसे मिळाले होते. या घटनेची माहिती त्याने वरिष्ठांना दिली. लगेच आरपीएफ आणि लोहमार्ग पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना देण्यात आली. सिनिअर सेक्शन इंजिनिअर धनंजय काणे यांनीही लोहमार्ग पोलीस ठाण्यात संपर्क साधला. माहिती मिळताच आरपीएफचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, सहायक पोलीस निरीक्षक मुबारक शेख, उपनिरीक्षक रवी वाघ, उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, हेड कॉन्स्टेबल गजानन शेळके, रोशन मोगरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आढळलेली काडतुसे हेतुपरस्सर कुणीतरी लपवून ठेवली असून संधी मिळाल्यानंतर तो ती घेऊन गेला असता, अशी चर्चा रेल्वे वर्तुळात आहे.
सात काडतूस अद्यापही गायब
२१ नोव्हेंबर २०१८ रोजी इंडो-तिबेट सुरक्षा दलाच्या ७ व्या बटालियनचे जवान लखनौ येथून विजयवाडा येथे निवडणूक विशेष रेल्वेने जात असताना धावपळीत त्यांचे ९ एम.एम.चे ५६९ काडतूस विसरले होते. त्यापैकी ४६४ काडतूस लोहमार्ग पोलिसांनी परत केले. त्यानंतर सोमवारी ९८ काडतुसे सापडले. परंतु अद्यापही ७ काडतुसे गायब आहेत. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक वासुदेव डाबरे करीत आहेत.