नाव नेमकी बुडाली कशी?

By admin | Published: July 12, 2017 02:42 AM2017-07-12T02:42:29+5:302017-07-12T02:42:29+5:30

वेणा डॅमची दुर्घटना होऊन दोन दिवस लोटले असून नेमकी ही घटना झाली कशी, याबाबत अद्यापही ठोसपणे सांगणे शक्य झालेले नाही.

How did the name blink? | नाव नेमकी बुडाली कशी?

नाव नेमकी बुडाली कशी?

Next

‘सेल्फी’ नव्हे नावाड्यामुळे घात झाल्याचा अमोलचा दावा : खांदारे कुटुंबीयांनी केले खंडन
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेणा डॅमची दुर्घटना होऊन दोन दिवस लोटले असून नेमकी ही घटना झाली कशी, याबाबत अद्यापही ठोसपणे सांगणे शक्य झालेले नाही. मोबाईलवर ‘सेल्फी’ काढण्याच्या नादात नव्हे तर नावाड्यामुळे हा घात झाला असल्याचा दावा या दुर्घटनेतून बचावलेल्या अमोल दोडके याने प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. तर नागपुरातून आलेल्या सर्व तरुणांच्या मस्तीमुळेच नाव बुडाली असल्याचे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या खांदारे भावंडाच्या कुटुंबीयांचे
म्हणणे आहे. ‘फेसबुक लाईव्ह’वरचा ‘व्हिडीओ’ आणि आता अमोलचे आलेले वक्तव्य यामध्ये अनेक तफावती आढळून येत असल्याचा दावादेखील त्यांनी केला आहे.
वेणा डॅममध्ये रविवारी नागपुरातील तरुण सहलीसाठी गेले होते. सायंकाळी ६.३० च्या सुमारास नाव बुडाली व त्यात नावेत असलेल्या ११ जणांपैकी ८ तरुणांचा मृत्यू झाला. अमोल व रोशन दोडके हे दोघेही बंधू पोहता येत असल्यामुळे बचावले. या घटनेच्या दोन दिवसानंतर अमोलने नेमकी घटना काय झाली, यावर भाष्य केले.
‘व्हिडीओ’ आणि अमोलच्या दाव्यात विसंगती
अमोल करीत असलेला दावा आणि ‘फेसबुक लाईव्ह’वरील ‘व्हिडीओ’ यात विसंगती असल्याचे अक्षय व रोशन खांदारे यांचे चुलत भाऊ गणेश यांचे म्हणणे आहे. मुळात सर्व तरुण उच्चशिक्षित होते आणि अक्षय व रोशन त्यांना ओळखतदेखील नव्हते. पूजेच्या बहाण्याने त्यांना नावेत जबरदस्तीने बसविण्यात आले. अमोल म्हणतोय की आम्ही दोन नाव घेण्यास नावाड्याला सांगितले होते. मात्र प्रत्यक्ष घटनास्थळी एकच नावाडी उपस्थित होता. मग दुसरी नाव चालविणार तरी कोण होते, असा प्रश्न गणेश यांनी उपस्थित केला. ‘व्हिडीओ’त मस्ती करणारे सर्व जण नावेच्या एका बाजूला बसलेले दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला बसलेले खांदारे बंधू वारंवार म्हणत होते की नावेत पाणी भरू शकते. नावेच्या एका बाजूला होऊ नका. मात्र कुणीही त्यांचे ऐकले नाही. नावेत मद्य पिल्यानंतर सर्व भीती निघून गेली असे एक जण म्हणाला होता. अमोलदेखील मस्ती करताना दिसून येत आहे. ‘२०० के स्पीड से चलेंगे’, ‘होडी फाटेल पण मजा वाटेल’ असे तोच म्हणत होता. पाणी नावेत येत असल्याचे दिसत असतानादेखील तो मस्तीत होता. नावेत तर ‘व्हिडीओ’च्या वेळीच पाणी शिरले होते. मग अमोलने हे पाणी उशिरा शिरल्याचा दावा कसा काय केला, असा प्रश्न गणेश यांनी उपस्थित केला. खरे काय आहे हे शवविच्छेदन अहवालावरून समोर येईलच. नाहक नावाड्यावर आरोप करणे अयोग्य आहे, असे ते म्हणाले.

काय म्हणतोय अमोल
जास्त लोक असल्यामुळे आम्ही नावाड्याला दोन नाव देण्यास सांगितले. मात्र हे आमच्यासाठी नेहमीचेच आहे, असे त्याने उत्तर दिले व आम्ही एकाच नावेतून पाण्यात गेलो. पाण्याच्या मध्यावरून परतत असताना नावाड्याने एका ठिकाणी काही क्षणासाठी नाव थांबविली. यामुळे नावेचे संतुलन थोडे बिघडले व पाणी आत शिरले. त्यामुळे एका मित्राचा पॅन्ट ओला झाला. तो उभा झाला तर नाव एका बाजूला झुकली. ते सांभाळायला गेलो तर दुसऱ्या बाजूने झुकली. यात नावेमध्ये जास्त प्रमाणात पाणी भरले. नावाड्याला मी आणि भावाने म्हटले की आम्ही उतरून आधार देतो. तू चप्पू चालवून नाव पुढे ने. तेवढ्या वेळात नावेतून पाणी काढा. मात्र नावाड्याने उडी मारली. त्यामुळे सर्व जण घाबरले व त्यातच नाव बुडाली.
ज्या ठिकाणी ‘सेल्फी’ काढली त्या ठिकाणी पाणी फार खोल नव्हते. तेथे नाव पलटली असली तरी सगळे सहज उभे राहू शकले असते. ‘फेसबुक लाईव्ह’ केल्यानंतर सुमारे २० मिनिटांनी नाव बुडाली, असे अमोलने सांगितले. नाव बुडत असताना किनाऱ्यावरदेखील लोक होते. मात्र कुणीही मदतीला आले नाही. ७ ते १० मिनिटात आम्ही पोहून किनाऱ्यावर पोहोचलो, असा दावा अमोलने केला.

Web Title: How did the name blink?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.