वाहन चालवायचे तरी कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:47 AM2017-11-02T01:47:11+5:302017-11-02T01:47:24+5:30
शहरातील अतिव्यस्त इतवारी ठोक बाजारापेठेकडे जाणारा व समोर भंडारा मार्गाला जुळणारा अतिवर्दळीचा रस्ता असलेल्या सीए रोडवर अतिक्रमण कुठे नाही अशी स्थिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील अतिव्यस्त इतवारी ठोक बाजारापेठेकडे जाणारा व समोर भंडारा मार्गाला जुळणारा अतिवर्दळीचा रस्ता असलेल्या सीए रोडवर अतिक्रमण कुठे नाही अशी स्थिती आहे. या मार्गावरील मोजक्या व्यावसायिक संस्था सोडल्यास इतर कुणाकडेच स्वत:ची पार्किंगची सोय नाही. यामुळे कारपासून ते दुचाकी वाहने रस्त्यावरच उभी असतात. यातच मेट्रो रेल्वेचे काम सुरू असल्याने दर मिनिटाला वाहतूक खोळंबण्याचे प्रकार होतात. या समस्येकडे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने या मार्गाने वाहन चालविणे धोकादायक झाले आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच वाहतूक विभाग व अतिक्रमण विरोधी पथक लक्ष देईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अग्रसेन चौक नव्हे सहासीटर आॅटोचा स्टॅण्ड
मेट्रो रेल्वेमुळे अग्रसेन चौकातील वाहतूक सिग्नल बंद ठेवण्यात आले आहे. वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी मेट्रोच्या कर्मचाºयांवर सोपविण्यात आली आहे. परंतु यांना न जुमानता अनेक सहासीटर आॅटो चौकात ठाण मांडून उभे असतात. यांच्या सोबतीला हातठेले आणि काही दुकानदार दुकानाचे साहित्य फूटपाथवर मांडून ठेवत असल्याने पादचाºयांना चालावे कुठून हा प्रश्न पडतो.
जुना भंडारा रोड मेयो हॉस्पिटल चौक ते शहीद चौक इतवारी ते पुढे सुनील हॉटेलपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. २० फुटावर आलेला हा रस्ता ६० फूट रुंद करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. मनपाच्या स्थायी समितीने २४५ कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. परंतु अद्यापही कामाला सुरुवात झाली नाही. येथील लोकप्रतिनिधींचाच याला विरोध असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांचा आहे. अरुंद असलेल्या या रस्त्यावर दुकानांचे साहित्यही रस्त्यावरच उभे केले जात असल्याने पायी चालणेही कठीण झाले आहे.
गीतांजली टॉकीज चौकात रस्त्यावर हातठेले
गीतांजली टॉकीज चौक येथे खासगी ट्रॅव्हल्स रस्ता अडवून प्रवाशांच्या प्रतीक्षेत उभ्या असतात. सायंकाळी तर या मार्गाने पायी चालणेही कठीण होते. यातच रस्त्याच्या कडेला उभे असलेले खाद्य पदार्थांचे हातठेले आणि त्यांच्याकडे येणारे ग्राहक रस्त्यावरच आपले वाहन उभे करीत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होते. विशेष म्हणजे, या चौकाच्या हाकेच्या अंतरावर वाहतूक पोलीस ठाणे आहे. परंतु त्यांचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अतिक्रमणाच्या विळख्यात शहीद चौक
शहीद चौकात वाहतूक पोलीस विभागाने, येथे वाहने उभे करू नये असा फलक लावला. मात्र, याच फलकाला रेटून अनेक वाहने उभी केली जातात. यामुळे येथे पोलिसांचाही वचक राहिला नसल्याचे दिसून येते. या मार्गावरील दुकानदारांचे अर्धेअधिक दुकाने तर रस्त्यावरच लागतात. खाद्यपदार्थांचे हातठेले, किरकोळ दुकानदार तर रस्त्यावर बसून सर्रास आपला माल विकतात, परंतु कुणीच काही बोलत नाही. अतिक्रमण करणाºयांकडून हप्ता वसुली होत असल्याने त्यांना कुणी हात लावत नसल्याचे एका व्यावसायिकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
हंसापुरी रोडवर लागतात दुकाने
हंसापुरी रोडवरील अनेक दुकानदार आपले दुकान रस्त्यापर्यंत समोर आणून अतिक्रमण करतात. यामुळे वाहतूकीची समस्या निर्माण झाली आहे. महिन्यात एक-दोन वेळा येथे अतिक्रमण विरोधी कारवाई होत असलीतरी पुन्हा ‘जैसे-थे’ होते. येथील अतिक्रमणावर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
मेयोच्या प्रवेशद्वारावरच अतिक्रमण
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) मुख्य प्रवेशद्वारावरच आॅटोरिक्षा उभे असतात, तर द्वारालगत विविध खाद्यपदार्थांच्या हातठेलेवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. परिणामी, गंभीर रुग्णांना तत्काळ रुग्णालय गाठणे कठीण जाते. विशेष म्हणजे, सात मुख्य रस्ते या चौकात येत असतानाही व अनेक मोठे अपघात झाले असतानाही येथे वाहतूक पोलीस दिसूनही येत नाही. यामुळे अनेक वाहनचालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून या मार्गाने रहदारी करताना दिसून येतात.
इतवारीत पार्किंगची सुनियोजित व्यवस्थाच नाही
सीए रोडला समांतर असलेल्या टांगा स्टँड ते शहीद चौकापर्यंत सराफा बाजार आहे. सर्वाधिक राजस्व देणाºया या क्षेत्रात वाहन पार्किंगची सुनियोजित व्यवस्था नाही. यामुळे वाहतुकीची कोंडी होणे नेहमीचे झाले आहे. शहीद चौक ते तीननळ हा ब्रिटिशकालीन राष्टÑीय महामार्ग असून अतिक्रमणामुळे अरुंद होऊन गल्लीचे स्वरूप आले आहे. यातच येथील काही व्यावसायिक आपल्या दुकानासमोरील रस्त्यावर किरकोळ दुकानदारांना २०० ते ५०० रुपयांत जागा देतात. यामुळे अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे.