स्टेशनरीशिवाय कसे वितरित होतील वीज बिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:08 AM2021-05-12T04:08:53+5:302021-05-12T04:08:53+5:30
नागपूर : कोरोनामुळे वीज मिटर रिडिंग घेण्याचे कार्य प्रभावित झाले असताना आता वीज बिले वितरित करण्याची प्रक्रियाही संथ झाली ...
नागपूर : कोरोनामुळे वीज मिटर रिडिंग घेण्याचे कार्य प्रभावित झाले असताना आता वीज बिले वितरित करण्याची प्रक्रियाही संथ झाली आहे़ स्टेशनरी नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे़ परिणामी, नागरिकांची चिंता वाढली आहे़ लवकर बिल भरल्यामुळे मिळणाºया सवलतीपासून वंचित रहावे लागेल असे नागरिकांचे म्हणणे आहे़
वीज मिटर रिडिंग टप्प्याटप्प्यात होते व त्यानुसार बिलेही वितरित केले जातात़ दर महिन्यात ६ तारखेला बिले वितरणाची प्रक्रिया सुरू होते़ परंतु, या महिन्यात असे होऊ शकले नाही़ गोकुळपेठ, प्रतापनगर, वाडी यासह इतर अनेक ठिकाणी हीच समस्या आहे़ नागरिक बिलाची प्रतीक्षा करीत आहेत़ छापलेली बिले बाहेरून येतात़ स्थनिकस्तरावर त्यापासून ग्राहकनिहाय बिले तयार केली जातात़ परंतु, कागद नसल्यामुळे बिले थांबवण्यात आली आहेत़ सुत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी स्टेशनरी उपलब्ध झाल्यास बिलांचे वितरण १५ किंवा १६ तारखेपासून सुरू केले जाईल़ परिणामी, याच तारखेपर्यंत बिले भरण्याची मुदत असलेल्या ग्राहकांना सवलतीपासून वंचित रहावे लागेल़
-----------
स्टेशनरी लवकरच येईल
स्टेशनरी लवकरच येईल़ दर महिन्यात ११ तारखेला स्टेशनरी येते़ परंतु, या महिन्यात कोरोनामुळे विलंब झाला़ बिले वितरणाची प्रक्रिया सुरू आहे़
----- दिलीप दोडके, मुख्य अभियंता, महावितरण़