कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटशी कसा देणार लढा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 10:37 AM2021-11-29T10:37:52+5:302021-11-29T10:49:31+5:30

कोरोनाचा निर्णायक स्थितीत आरोग्य विभागावर सर्वाधिक कामाचा ताण होता. त्याच आरोग्य विभागातील रिक्त पदांमुळे स्थानिक प्रशासन अडचणीत आले होते; परंतु त्यानंतरही रिक्त पदे भरण्याकडे शासन गंभीर नसल्याचे चित्र आहे.

How to fight the new variant of Corona? | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटशी कसा देणार लढा?

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटशी कसा देणार लढा?

Next
ठळक मुद्दे आरोग्य विभागातील ५५ टक्के पदे रिक्तचंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक ६५ टक्के पदे भरलेलीच नाही

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोना संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात आली असताना दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडल्याने चिंता वाढली आहे. हा व्हेरिएंट अधिक आक्रमक असल्याने आवश्यक खबरदारी घेण्याचे सरकारकडून आवाहन केले जात आहे. याचा धोका झाल्यास आरोग्य विभागातील डॉक्टरांची रिक्त असलेली ५५ टक्के पदे रुग्णांसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा निर्णायक स्थितीत आरोग्य विभागावर सर्वाधिक कामाचा ताण होता. त्याच आरोग्य विभागातील रिक्त पदांमुळे स्थानिक प्रशासन अडचणीत आले होते; परंतु त्यानंतरही रिक्त पदे भरण्याकडे शासन गंभीर नसल्याचे चित्र आहे. उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ अंतर्गत नागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील वैद्यकीय व आरोग्य सेवेतील (गट अ) एकूण २६० डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. परंतु त्यांपैकी केवळ ११६ पदे भरली असून १४४ पदे रिक्त आहेत. यात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक ६५ टक्के पदे रिक्त आहेत. याशिवाय, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात ६० टक्के, वर्धा जिल्ह्यात ५५ टक्के, भंडारा जिल्ह्यात ५१ टक्के तर सर्वांत कमी नागपूर जिल्ह्यात ३२ टक्के पदे रिक्त आहेत. ही माहिती, माहितीच्या अधिकारातून प्राप्त झाली आहे.

नागपूर जिल्ह्यातील ६४ पैकी २१ पदे रिक्त

नागपूर जिल्ह्यातील ‘गट अ’ वर्गातील ६४ पैकी ४३ पदे भरली असून २१ पदे रिक्त आहेत. यात आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रातील २ पैकी १, कुष्ठरोग विभागातील २, मध्यवर्ती कारागृहातील १, जिल्हा क्षयरोग विभागातील १, डागा रुग्णालयातील १९ पैकी ८, सर्वाेपचार रुग्णालयातील ३ पैकी १, प्रादेशिक मनोरुग्णालयातील १२ पैकी ५, तर जिल्हा परिषदेतील ४ पैकी १ पद रिक्त आहे.

भंडारा जिल्ह्यात ३७ पैकी १९ पदे रिक्त

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारी रोजी लागलेल्या आगीत १० चिमुकल्यांचा अत्यंत वेदनादायी मृत्यू झाला. त्यावेळी येथील रिक्त पदांचा मुद्दा पुढे आला होता; परंतु आता याला वर्ष होत असतानाही २२ मंजूर पदांपैकी केवळ ८ पदे भरली असून तब्बल १४ पदे रिक्त आहेत. एकूणच भंडारा जिल्ह्यात ३७ पैकी १९ पदे रिक्त आहेत.

गोंदिया जिल्ह्यात ३१, तर चंद्रपूर जिल्ह्यात २९ पदे रिक्त

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील १९ पैकी ११ पदे रिक्त आहेत. या जिल्ह्यात ४१ पैकी २५ पदे रिक्त आहेत. वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयातील १९ पैकी १२ पदे रिक्त आहेत. या जिल्ह्यात ३४ पैकी १९ पदे रिक्त आहेत.

गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयातील १९ पैकी १६ पदे रिक्त आहेत. या जिल्ह्यात ४० पैकी ३१ पदे रिक्त आहेत. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील १९ पैकी १२ पदे रिक्त आहेत; तर या जिल्ह्यात ४४ पैकी २९ पदे रिक्त आहेत.

रिक्त पदी बॉण्डेड व कंत्राटी डॉक्टरांची नियुक्ती

‘गट अ’ वर्गातील पर्मनंट डॉक्टरांची पदे रिक्त असली तरी त्या जागेवर बॉण्डेड व कंत्राटी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. जवळपास १०० टक्के पदे भरलेली आहेत.

- डॉ. संजय जयस्वाल, उपसंचालक, आरोग्य विभाग, नागपूर

पर्मनंटच्या जागी कंत्राटी नेमण्यावरच प्रश्नचिन्ह

मंजूर असलेल्या पर्मनंट डॉक्टरांच्या पदी बॉण्डेड व कंत्राटी डॉक्टर नेमण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते. परिणामी, याचा प्रभाव रुग्णसेवेवर व कामकाजावर होतो. हे डॉक्टर कधी नोकरी सोडतील याचा नेम राहत नाही. शिवाय, ते जबाबदारी किती गंभीरतेने घेतात, हा प्रश्नही आहे.

-डॉ. सिद्धांत भरणे

:: सहा जिल्ह्यांतील रिक्त पदांची स्थिती

नागपूर जिल्हा : ३२ टक्के

भंडारा जिल्हा : ५१ टक्के

वर्धा जिल्हा : ५५ टक्के

गडचिरोली जिल्हा : ६० टक्के

गोंदिया जिल्हा : ६० टक्के

चंद्रपूर जिल्हा : ६५ टक्के

Web Title: How to fight the new variant of Corona?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.