‘खुशी’, ‘गम’मध्ये कशी मिळणार ‘तिची’ साथ ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:01 PM2019-05-22T23:01:49+5:302019-05-22T23:02:52+5:30
बहुप्रतिक्षित लोकसभा निकालांसाठी राजकीय पक्ष, कार्यकर्ते यांच्याकडून जय्यत तयारी झाली आहे. मतमोजणीच्या फेऱ्यांपासून विविध जबाबदाऱ्यांचे वाटप झाले आहे. मात्र असे असले तरी अनेक कार्यकर्त्यांमध्ये एक अस्वस्थता आहे. कुणाची जीत होईल, कुणाची हार होईल. मात्र काहीही झाले तरी ‘तिचा’ आधार लागणारच. त्यांच्या मनात प्रश्न आहे की गुरुवारी ‘ती’ कशी मिळेल ?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहुप्रतिक्षित लोकसभा निकालांसाठी राजकीय पक्ष, कार्यकर्ते यांच्याकडून जय्यत तयारी झाली आहे. मतमोजणीच्या फेऱ्यांपासून विविध जबाबदाऱ्यांचे वाटप झाले आहे. मात्र असे असले तरी अनेक कार्यकर्त्यांमध्ये एक अस्वस्थता आहे. कुणाची जीत होईल, कुणाची हार होईल. मात्र काहीही झाले तरी ‘तिचा’ आधार लागणारच. त्यांच्या मनात प्रश्न आहे की गुरुवारी ‘ती’ कशी मिळेल ?
मतमोजणीच्या दिवशी प्रशासनाने ‘ड्राय डे’ घोषित केला आहे. त्यामुळे मद्यविक्री बंद राहणार आहे. निकालांची मतमोजणी ही मध्यरात्रीपर्यंत चालणार आहे. विजय मिळाला तर जल्लोष आणि पराभव पदरी आला तर मनाशी खंत असे वातावरण तर राहीलच. मात्र जल्लोषानंतरच जल्लोष आणि जगाला विसरुन पराभवाचे ‘चिंतन’ करण्यासाठी अनेक जणांकडून निश्चितपणे स्पेशल ‘ड्रिंक’चा आधार घेण्यात येईल. काहीही झाले तरी ही व्यवस्था झाली पाहिजे यासाठी बुधवारी रात्री ‘सेटिंग’ करण्यात येत होते.
यही तो मौका है...
राजकारणाशी दुरान्वयानेदेखील संबंध नसलेल्यांनी निकालाच्या मुहूर्तावर विशेष तयारी केली आहे. विजय कुणाचाही होवो, ‘गॉसिप्स’ला तर उधाण येणारच. मग असा ‘मौका’ खरा ‘शौकिन’ कसा सोडेल. याच विचारातून अनेक तळीरामांनी बुधवारीच ‘स्टॉक’ जमा करुन ठेवला आहे. ज्यांचा विजय झाला त्यांच्या आनंदासाठी अन् ज्यांचा पराभव झाला आहे त्यांना सांत्वना देण्यासाठी ‘एकच प्याला’ तर होणारच हीच त्यांची भावना आहे. निकाल काहीही लागो, मात्र ‘जाम’ टकराविण्यासंदर्भात सर्वच स्तरातील शौकिनांच्या विचारात ‘बहुमत’ दिसून येत आहे.