कसे लागणार सुपरफास्ट निकाल ?
By admin | Published: December 21, 2015 03:06 AM2015-12-21T03:06:07+5:302015-12-21T03:06:07+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे हिवाळी परीक्षांचे निकाल प्रचंड वेगात जाहीर होतील, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला होता.
नागपूर विद्यापीठ : केवळ १० परीक्षांचेच निकाल जाहीर
योगेश पांडे नागपूर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे हिवाळी परीक्षांचे निकाल प्रचंड वेगात जाहीर होतील, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात मात्र प्रशासनाच्या कल्पनेतील ही ‘बुलेट ट्रेन’ ढक्कलगाडीच निघाली आहे. डिसेंबर महिन्याचा चौथा आठवडा सुरू होऊनदेखील विद्यापीठाला केवळ दहाच परीक्षांचे निकाल लावण्यात यश आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यातील ८ परीक्षांमधील परीक्षार्थ्यांची एकूण संख्या केवळ २४ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अशा स्थितीत विद्यापीठाचा दावा पूर्णत: ‘फेल’ झाला असल्याचेच दिसून आले आहे.
नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सर्वात जास्त चिंता असते ती निकाल कधी लागतील याची. हिवाळी परीक्षांच्या पहिल्या टप्प्याला १९ आॅक्टोबरपासून सुरुवात झाली. हिवाळी परीक्षांपासून विद्यापीठाने सर्व व्यावसायिक परीक्षांचे ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मूल्यांकनाचा वेग वाढेल व पहिल्या टप्प्याचे निकाल नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत जाहीर करण्यात येतील, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला होता.
परंतु आतापर्यंत मात्र केवळ १० परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले व परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी या दोघांशीही संपर्क होऊ शकला नाही. निकालांचा एकूण वेग पाहता हिवाळी परीक्षांचे सर्व निकाल लागण्यासाठी मार्च महिना उजाडणार की काय, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.
८ परीक्षांतील विद्यार्थीसंख्या अवघी २४
विद्यापीठाने आतापर्यंत जे १० निकाल लावले आहेत, त्यातील ८ परीक्षांतील विद्यार्थ्यांची संख्या अवघी २४ आहे. ४ परीक्षांमध्ये अवघा एक परीक्षार्थी आहे. ‘बीएफए’च्या प्रथम व अंतिम वर्षाचे निकालदेखील जाहीर झाले आहेत. यातील अर्ध्याहून अधिक निकाल ‘विथहेल्ड’मध्ये ठेवण्यात आले आहेत.
४५ दिवस उलटले, आता काय ?
निकाल लावण्यासाठी दिवसांचे बंधन नाही, असे प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना अनेकदा सांगण्यात येते. परंतु महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम ७२ मधील तरतुदीनुसार परीक्षेच्या अखेरच्या दिवसापासून ३० दिवसांच्या आत आणि कोणत्याही परिस्थिती उशिरात उशिरा ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर व्हायला हवा, असे राज्य शासनाकडून विधिमंडळात मागील आठवड्यातच स्पष्ट करण्यात आले होते. अनेक परीक्षा संपून आता ४५ दिवस उलटून गेले आहे. त्यामुळे आता विद्यापीठाचे यावर काय पाऊल राहणार हादेखील कळीचा प्रश्न आहे.