नगरपंचायतीचा दर्जा मग ग्रा.पं.ची निवडणूक कशी?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 11:46 AM2023-10-05T11:46:18+5:302023-10-05T11:50:13+5:30
निलडोह, डिगडोह, कोंढाळी, बिडगाव-तरोडी येथील निवडणुकीबाबत प्रश्नचिन्ह
नागपूर : राज्य निवडणूक आयोगाने नागपूर जिल्ह्यातील २६५ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यातील चार ग्रामपंचायतींना नगर पंचायत, नगर परिषदेचा दर्जा देण्यासाठी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, अंतिम अधिसूचना बाकी आहे. यात डिगडोह ग्रामपंचायतीला नगर परिषद, तर निलडोह, कोंढाळी, बिडगाव-तरोडी या तीन ग्रामपंचायती नगर पंचायत होतील. त्यामुळे येथे ग्रामपंचायतीची निवडणूक होणार की नाही, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
या ग्रामपंचायतींना नगर पंचायत आणि नगर परिषदेचा दर्जा देण्याबाबतची अंतिम अधिसूचना एक-दोन महिन्यांत निघाल्यास ग्रामपंचायत बरखास्त होईल. त्यामुळे येथे आता निवडणूक झाल्यास सर्व सदस्यांचे सदस्यत्व रद्द होईल व निवडणुकीवरील खर्चही वाया जाईल.
जिल्हाधिकाऱ्यांना भेटले शिष्टमंडळ
कोंढाळी नगरपंचायत संदर्भात बुधवारी काटोल येथील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच शासनाचे लक्ष वेधण्याची विनंती केली. कोंढाळी ग्रामपंचायत करण्याबाबत २१ जून २०२३ रोजी पहिली अधिसूचना काढण्यात आली. यामध्ये नागरिकांचे आक्षेप आणी हरकती लेखी स्वरूपात मागविण्यात आले, पण एकही आक्षेप व हरकती न आल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी १४ ऑगस्ट २०२३ रोजी उपसचिव नगरविकास विभाग यांच्याकडे प्रस्ताव पाठविला, परंतु शासनाने अधिसूचना न काढल्यामुळे निवडणूक लागली. त्यामुळे नामनिर्देशन पत्र भरणे १६ तारखेपासून सुरू होत आहे. त्याआधी जर नगरविकास विभागाकडून अधिसूचना काढली, तर कोंढाली नगरपंचायत होऊ शकते, असे या शिष्टमंडळाचे म्हणणे होते. शिष्टमंडळात काटोल पंचायत समितीचे उपसभापती निशिकांत नागमोते, समीर उमप जि. प. सदस्य, प्रकाश वसू, राजू हरणे; सतीश शिंदे, नरेश अरसडे यांचा समावेश होता.
नगर विकास विभागाची अंतिम अधिसूचना अद्याप निघाली नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे प्रशासनाकडून कार्यवाही होत आहे. संबंधित ग्रामपंचायतीसंदर्भात संदर्भात काहींनी विचारणा केली आहे. त्याअनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविण्यात येईल.
- सचिन गोसावी, उपजिल्हाधिकारी, ग्रामपंचायत निवडणूक विभाग