किती दिवस चालणार शटर बंद आणि दुकान सुरू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 11:37 AM2021-07-27T11:37:25+5:302021-07-27T11:38:41+5:30
Nagpur News दुपारी ४ वाजेनंतर दुकाने वरकरणी बंद दिसत असली तरी व्यवहार सुरूच असतो. हीच स्थिती किराणा, कापड विक्रेते, क्राॅकरी विक्रेते यांची आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाची धास्ती अन् लॉकडाऊनचा ससेमिरा आणि त्यामुळे डबघाईस आलेला व्यापार, या सगळ्यांचा परिणाम ‘शटर बंद-दुकान सुरू’ अशी स्थिती शहरात दिसून येत आहे. कायद्यापुढे लोटांगण घालत व्यापाऱ्यांनी सलग दोन दीर्घकालीन लॉकडाऊन अनुभवले. दुसऱ्या लाॅकडाऊननंतर शासनाने निर्बंधांमध्ये शिथिलता दिली असली तरी व्यापार आणि ग्राहकांचा योग जुळून येत नाही. त्याचा परिणाम व्यापारी आता आपल्या मनाप्रमाणे, मात्र थोड्या सजगतेने व्यापार उशिरापर्यंत करीत असल्याचे दिसत आहे. शहरात दुपारी ४ वाजेपर्यंतच दुकाने, रेस्टॉरंट, चहा टपऱ्या किंवा अन्य कोणत्याही व्यापाराला परवानगी आहे. त्यानंतर जमावबंदीचे आदेश आहेत. मात्र, दुपारी ४ वाजेनंतर दुकाने वरकरणी बंद दिसत असली तरी व्यवहार सुरूच असतो. हीच स्थिती किराणा, कापड विक्रेते, क्राॅकरी विक्रेते यांची आहे.
उपद्रवी पथकाकडेही केला जातोय कानाडोळा
शहरातील कोरोना लाऊडाऊनचे नियम पाळले जात आहेत की नाही, यावर लक्ष ठेवणारे उपद्रवी पथक सज्ज आहे. जागोजागी हे पथक टेहळणी करीत असते आणि संधी सापडताच संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो. काही व्यापाऱ्यांनी या पथकाची धास्ती घेतली तर काही कानाडोळा करीत असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी संघटित होऊन पथकाच्या कारवाईला शह देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
मागच्या दाराने कारभार सुरू
रेस्टॉरंट, बार यांना दुपारी ४ वाजेनंतर ऑनलाइन व पार्सल व्यवहाराची परवानगी दिली आहे. त्यामुळे, रात्री ८ वाजेपर्यंत यांचे दुकान सुरूच असते. मात्र, बाहेरून पार्सल सुविधेचे फलक लावून मागच्या दाराने ग्राहकांचे स्वागत केले जात असल्याचे दिसून येते. त्यांच्यासाठी उपद्रवी पथकाची नजर चुकविण्याचे मार्ग सिद्ध करण्यात आले आहेत.
इमर्जंसीचे ग्राहक अन् दुकानदार सज्ज
भारतीय मानसिकता आणि ग्राहकांची नियमित सवय सर्व व्यापाऱ्यांना ठाऊक आहे. तेल-तिखट-मीठ आदी अगदी क्षुल्लक गोष्टींसाठी ग्राहक किराणा दुकानाचे दार ठोठावत असतो. निर्बंधांमुळे व्यापाराला ब्रेक लागला असल्याने, ही संधी व्यापारी सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे, दुपारी ४ वाजेनंतरही दुकानदार किंवा त्यांचा नोकर बाहेर बसलेला असतो. ग्राहक येताच त्याला मागच्या दारातून बोलावले जाते किंवा ग्राहकाकडून यादी मागविली जाते व थोड्या वेळाने येण्यास किंवा दुसरीकडे उभे राहण्यास सांगितले जाते. ही स्थिती शहरातील वेगवेगळ्या बाजारपेठांत एकसारखीच आहे.
हे घ्या पुरावे
धंतोली, यशवंत स्टेडियम : ट्रेड गॅलरीमध्ये असलेल्या आइसस्क्रीम शॉपीपुढे संध्याकाळी ५.३० वाजता ग्राहक असे आइसस्क्रीमचा आनंद घेत होते. अर्धे शटर बंद करून हा व्यवहार सुरू होता.
रामदासपेठ : चहाच्या दुकानात निर्बंधाच्या वेळेनंतरही अनेक ग्राहक चहाचा फुर्का मारत होते. शिवाय, येथेच असलेल्या रेस्टॉरंटमध्ये ग्राहक गर्दीने उभे होते.