१३५ वर्ष जुन्या ब्रिटीशकालीन पुलावर आणखी किती दिवस गाड्या चालविणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 11:13 AM2021-07-19T11:13:57+5:302021-07-19T11:14:37+5:30
Nagpur News ब्रिटिश काळात बांधलेल्या या पुलाने निर्धारित १०० वर्षे टिकण्याच्या मुदतीपेक्षा ३५ वर्षे अधिकचे वय गाठले आहे. हळूहळू खिळखिळ्या हाेत चाललेल्या या पुलावर डागडुजी करून वाहतूक सुरू आहे; पण एखादा माेठा अपघात कधी हाेईल सांगता येत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनी रेल्वे काॅलनी परिसरात प्रस्तावित आयएमएस प्रकल्पासाठी वेगाने हालचाली सुरू आहेत. मात्र, तेवढ्याच तत्परतेने अजनी रेल्वे पुलाबाबत विचार केला जात नाही. ब्रिटिश काळात बांधलेल्या या पुलाने निर्धारित १०० वर्षे टिकण्याच्या मुदतीपेक्षा ३५ वर्षे अधिकचे वय गाठले आहे. हळूहळू खिळखिळ्या हाेत चाललेल्या या पुलावर डागडुजी करून वाहतूक सुरू आहे; पण एखादा माेठा अपघात कधी हाेईल सांगता येत नाही. त्यामुळे जीर्ण झालेल्या पुलावर आणखी किती दिवस गाड्या चालविणार, असा सवाल केला जात आहे.
दक्षिण नागपूर व मध्य नागपूरला जाेडणारा हा महत्त्वाचा पूल आहे. पुलाच्या निर्मितीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदाेलन करणारे माजी नगरसेवक तनवीर अहमद यांनी सांगितले की, १९८५ मध्ये अजनी पुलाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर बांधकाम करणाऱ्या ब्रिटिश कंपनीने त्याची मुदत संपल्याचे व यानंतर आमची जबाबदारी राहणार नसल्याचे पत्र पाठविले हाेते. त्यावेळी रेल्वेच्या ब्रिज विभागाच्या पथकाने येथे येऊन पाहणी केली हाेती. या पथकाने आणखी २५ वर्षे पुलाला काही हाेणार नाही, असा दावा केला हाेता. २०१० मध्ये तिही मुदत संपलेली आहे. मात्र, पुलाच्या नव्याने निर्मितीसाठी काही करण्यात आले नाही. महापालिका, रेल्वे प्रशासन आणि रेल्वेमंत्र्यांनाही निवेदन सादर करण्यात आले; पण हालचाली झाल्या नसल्याचे अहमद यांनी सांगितले.
लाेखंडी गर्डरचा आधार
१९६२-६३ च्या काळात चीन युद्धादरम्यान दारूगाेळा भरलेल्या वॅगनमध्ये पुलाखाली स्फाेट झाला हाेता. त्यावेळी पुलाला तडे गेले हाेते. त्यानंतर लाेखंडाच्या गर्डरच्या आधारे पुलाचे दाेन भाग जाेडण्यात आले.
फुटपाथ काेसळण्याचा धाेका
पुलाच्या फुटपाथचा स्लॅब अनेक ठिकाणी जीर्ण झाला असून, त्याचे पत्रे खाली पडले आहेत. हे फुटपाथ काेसळण्याचा धाेका निर्माण झाला आहे. त्यामुळे रेल्वेने बॅरिकेड लावून फुटपाथवरून रहदारी बंद केली आहे.
अनेक ठिकाणी तडे, वारंवार दुरुस्ती
पुलाच्या स्लॅबलाही अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे वारंवार डागडुजी करावी लागते. नुकतेच या पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनानुसार हा पूल १९२७ साली बांधला गेला हाेता. त्याच काळात रामझुल्याचेही बांधकाम झाले हाेते. मात्र, रामझुल्यावर एवढी वाहतूकही नाही आणि रेल्वेची अधिक रहदारीही नाही. अजनी पुलावरून प्रचंड वाहतुकीसह धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या कंपनाने तुटफूट हाेण्याचा धाेका आहे. असे असताना रामझुल्याचे नूतनीकरण झाले; पण अजनी पूल तसाच राहिला.
२०१३ मध्ये या पुलाच्या निर्मितीचा प्रस्ताव मंजूर झाला हाेता व ३७२ काेटी रुपयांची तरतूदही करण्यात आली हाेती. मात्र, पुढे निवडणुकीनंतर पुलाचे काम पुन्हा थंडबस्त्यात गेले. यावेळी अजनी आयएमएस प्रकल्पांतर्गत नव्या पुलाच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे.