मौदा तालुक्यात अनधिकृत पॅथॉलॉजी किती?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:07 AM2021-07-08T04:07:28+5:302021-07-08T04:07:28+5:30
मौदा : मौदा तालुक्यात अनेक पॅथॉलॉजी कार्यरत आहेत. मात्र यातील अनेकांकडे पॅरामेडिकल कौंन्सिलचा परवाना नाही. याची शहानिशा करून अनधिकृत ...
मौदा : मौदा तालुक्यात अनेक पॅथॉलॉजी कार्यरत आहेत. मात्र यातील अनेकांकडे पॅरामेडिकल कौंन्सिलचा परवाना नाही. याची शहानिशा करून अनधिकृत पॅथॉलॉजी चालकावर तत्काळ कारवाई करावी, अशी सूचना महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषदेने जिल्हाधिकारी, आरोग्य व पोलीस अधिकाऱ्यांना केली आहे.
तालुका व जिल्हा पातळीवर ठिकठिकाणी मोठ्या संख्येने पॅथॉलॉजी उभारण्यात आल्या आहेत. त्या वैध की अवैध याची कुणीही पडताळणी केली नाही. यासोबतच अधिकृत पॅथाॅलाॅजीवर नियमानुसार कुठलीही कारवाई आरोग्य, जिल्हा प्रशासनातर्फे झाली नाही. त्यामुळे तालुक्यात गोरगरीब रुग्णांची पॅथॉलॉजीमध्ये तपासणीच्या नावाखाली लूट करण्यात येत आहे. महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषदेच्या नियमानुसार राज्य नोंदवहीत ज्यांच्या नावाची नोंद आहे त्या पॅथॉलॉजींना परिषदेचा नोंदणी क्रमांक व प्रमाणपत्र दिले जाते. मौदा येथे केवळ एकाच पॅथॉलॉजीला याबाबतचे प्रमाणपत्र मिळाले आहे. बाकी पॅथॉलॉजी चालकाकडे असे प्रमाणपत्र आहे का, याची चौकशी होणे गरजेचे आहे.
--
तहसीलदार, विकास अधिकाऱ्यांचे पथक बनवून तालुक्यातील पॅथॉलॉजीची पडताळणी करून कारवाई करू. काही ठिकाणाहून रक्ताचे नमुने संकलन करून तपासणीसाठी बाहेर पाठविले जातात.
- डॉ. रूपेश नारनवरे, तालुका आरोग्य अधिकारी, मौदा
---
माझ्याकडे महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषदेचे कोणतेही पत्र आलेले नाही. तालुक्यात काही पॅथॉलॉजी अनधिकृत असतील तर निश्चितच कारवाई केली जाईल.
प्रशांत सांगळे, तहसीलदार, मौदा