पहिली ते आठवीच्या निकालाचे गणित जुळविणार कसे? शिक्षकांमध्ये संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 11:19 AM2020-04-27T11:19:35+5:302020-04-27T11:21:01+5:30
लॉकडाऊन वाढल्याने शिक्षणमंत्र्यांनी परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश द्यावा, असे निर्देश दिले होते. पण पुढच्या वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेशित करताना निकाल लावणे गरजेचे आहे. मात्र निकाल कसा लावावा, यासंदर्भात शिक्षण संचालकांनी शिक्षकांना निर्देश दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून शाळा,महाविद्यालये १६ मार्चपासूनच बंद करण्यात आली होती; नंतर लॉकडाऊन वाढल्याने शिक्षणमंत्र्यांनी परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश द्यावा, असे निर्देश दिले होते. पण पुढच्या वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेशित करताना निकाल लावणे गरजेचे आहे. मात्र निकाल कसा लावावा, यासंदर्भात शिक्षण संचालकांनी शिक्षकांना निर्देश दिले आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून निकाल लावण्याची पद्धतही शिक्षकांना पाठविली आहे. यूट्यूबची ही लिंक काहीच मुख्याध्यापकांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे ज्या मुख्याध्यापकांना ही लिंक पोहचली नाही, त्यांच्यापुढे निकाल लावण्याबाबतचा पेच कायम आहे.
कदाचित पहिल्यांदाच वार्षिक परीक्षा न घेता शिक्षकांना विद्यार्थ्यांचे निकाल लावावे लागत आहे. पण निकाल लावताना विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करावे, असा संभ्रम शिक्षकांमध्ये होता. यासंदर्भात शिक्षण संचालकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काही निर्देश दिले होते, तरीसुद्धा मूल्यांकनाचा तिढा कायम होता. लॉकडाऊन संपल्यानंतर मेच्या पहिल्याच आठवड्यात निकाल जाहीर करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. पण निकाल कसा लावावा, यासंदर्भात गाईडलाईन नसल्याने निकाल लावताना शिक्षक आपापल्या पद्धतीने तर्क लावत होते. अखेर शिक्षण संचालकांकडून निकाल कशा पद्धतीने लावावा, यासंदर्भात गाईडलाईन यूट्यूबवर टाकण्यात आली. त्याची लिंक मुख्याध्यापकांना पाठविण्यात आली आहे. काही मुख्याध्यापकांना ही लिंक मिळाली तर काहीना याची माहितीदेखील नाही.
या लिंकमध्ये दिलेल्या पद्धतीनुसार पहिली ते आठव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचे प्रथम व द्वितीय सत्रातील आकारिक मूल्यमापनानुसार निकाल लावायचा आहे. या व्हिडिओमध्ये शासनाकडून निकालाबाबत कोणतेही स्वतंत्र मार्गदर्शन प्रशासनामार्फत दिले जाणार नाही, असेही स्पष्ट करीत मुख्याध्यापकांनी आपल्यास्तरावर निकालाचे नियोजन करावे, असेही सांगितले आहे. निकाल तयार करताना लॉकडाऊनच्या काळात शाळेत जाण्याची आवश्यकता नसल्याचेही स्पष्ट केले आहे. तसेच ३ मेच्या लॉकडाऊन संदर्भातील निर्णयानंतरच निकालाच्या तारखा घोषित करण्यात येईल, असेही सांगितले आहे.
१४ मेपासून उन्हाळ्याच्या सुट्या सुरू होणार आहेत. ४ मे रोजी लॉकडाऊन संपल्यास शालेय कामकाजासाठी केवळ नऊ दिवस उपलब्ध होणार आहे. या नऊ दिवसात सत्र अखेरचे निकाल, विद्यार्थी प्रवेशासाठी पालक संपर्क, पुढील शैक्षणिक सत्राची पूर्वतयारी करायची आहे. अशा परिस्थितीत निकालाचा घोळ संपला नाही तर पुढील अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे निकालासाठी सुस्पष्ट अशा सूचना शासनाद्वारे निर्गमित करण्याची मागणी शिक्षकांमधून होत आहे. निकालाचा आराखडा शासनानेच जाहीर करावा, जेणेकरून त्याची अंमलबजावणी करणे सोयीचे होईल व संपूर्ण शाळातील निकालात एकवाक्यता राहील.
बाळा आगलावे, राज्य सचिव, माध्यमिक डी.एड. शिक्षक महासंघ