रोज सायकलिंग किती? धावायचे किती?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 07:55 PM2021-10-05T19:55:02+5:302021-10-05T19:56:28+5:30
Nagpur News आपल्या क्षमतेनुसार त्याचे वेळापत्रक ठरवून ही एक्सरसाइज केल्यास शरीराला नुकसान पोहोचण्यापेक्षा फायदा होईल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
नागपूर : वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायाम केल्यास शरीरातील कॅलरी कमी करण्यास आणि चरबी जलद गतीने घटविण्यास मदत मिळते. सध्या शहरात सायकलिंग आणि धावताना लोक दिसून येतात. परंतु तज्ज्ञाशी बोलून आपल्या क्षमतेनुसार त्याचे वेळापत्रक ठरवून ही एक्सरसाइज केल्यास शरीराला नुकसान पोहोचण्यापेक्षा फायदा होईल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
वजन कमी करण्यासाठी काही जण तासनतास एक्सरसाइज करतात तर काही खूप कमी वेळासाठी एक्सरसाइज करतात. यामुळे नेमका उद्देश साध्य होत नाही. वजन कमी करण्यासाठी योग्य ‘डाएट’सोबत योग्य एक्सरसाइजही महत्त्वाची ठरते. ‘अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन’च्या एका रिसर्चनुसार, वजन कमी करण्यासाठी दर आठवड्याला १५० ते २५० मिनिटांची ‘हाय इंटेसिटी ट्रेनिंग’ आणि मध्यम एक्सरसाइज करणे गरजेचे आहे. तर एका अभ्यासानुसार नियमित कमीत कमी ४५ मिनिटे व्यायाम करायला हवा.
- हृदयाची क्षमता लक्षात घेऊन व्यायाम करा
प्रत्येक व्यक्तीची हृदयाची एक विशिष्ट क्षमता असते. त्यापेक्षा अधिक व्यायाम केल्यास हृदयास हानी पोहोचण्याचा धोका असतो. व्यायाम करताना आपली क्षमता लक्षात घ्यायला हवी. आपल्या हृदयाच्या क्षमतेनुसार ६० ते ८० टक्क्यांपर्यंत हार्टरेट जाईल, इतका व्यायाम करायला हवा. डॉक्टरांच्या देखरेखीखाली व ईसीजी मॉनिटरिंगखाली व्यायाम करायला हवा.
- रनिंग सुरू करण्यापूर्वी
ओळखीची चार माणसे धावायला लागली म्हणून आपणही धावायला सुरुवात करू नका. वय ३५ व त्यापेक्षा अधिक असेल तर धावणे सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञाचा सल्ला घ्या. धावणे हे प्रोग्रेसिव्ह असले पाहिजे. सुरुवातीला वॉर्मअप करायला हवा. सुरुवातील खूप वेगाने धावणे सुरू न करता हळूहळू धावण्याचा सराव करायला हवा. दररोज २० ते ४० मिनिटे धावायला हवे.
- सायकलिंग सुरू करण्यापूर्वी
सायकल चालविणे हा उत्तम व्यायाम आहे. सायकलिंगमुळे स्नायूंना आकार येतो, हाडे मजबूत होतात आणि वजन कमी होते. साधारण एका तासाच्या सायकलिंगमुळे ५०० कॅलरी बर्न करता येते. परंतु त्यापूर्वी आरोग्य तपासणी महत्त्वाची ठरते. यामुळे पाठीचे दुखणे, पायाचे विकार किंवा हृदयाचा समस्या निर्माण होत नाही.
-साधा-सोपा व्यायाम कुठला
पायी चालणे हा साधा पण प्रभावी व्यायाम आहे. रोज ४५ मिनिटे पायी चालल्यास वजन कमी होते, हृदय निरोगी ठेवण्यास व मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते. मधुमेहावरसुद्धा नियंत्रण आणता येते. नियमित जितका वेळ तुम्ही चालता तितक्या जलद गतीने कॅलरी घटण्यास मदत मिळते. शरीर फिट ठेवण्यास हा सोपा व्यायाम प्रकार आहे.
- नियमित व्यायामामुळे रक्दाब नियंत्रणात
व्यायाम हा हृदयविकारास अत्यंत उत्तम ठरतो. नियमित व्यायामामुळे रक्दाब नियंत्रणात राहतो. व्यायामामुळे एलडीएल कोलेस्टेरॉल (खराब कोलेस्ट्रेरॉल) कमी होते. हृदयाची पम्पिंग क्षमता वाढते. परंतु हृदयविकार असल्यास आपल्या कार्डिओलॉजिस्टचा सल्ला घेऊनच व्यायामास सुरुवात करावी. व्यायाम करण्यापूर्वी आपल्या हृदयाची क्षमता तपासण्यासाठी काही चाचण्या व २ डी इकोकार्डिओग्राफी करणे गरजेचे ठरते.
- डॉ. आनंद संचेती, हृदयरोग तज्ज्ञ