नागपूर शहरात महिला अत्याचारांचे नेमके आकडे तरी किती?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 10:37 AM2019-11-04T10:37:20+5:302019-11-04T10:38:28+5:30
२०१७ साली नागपूर शहरात महिलांवर नेमके किती अत्याचार झाले यासंदर्भातील वेगवेगळे आकडे दिसून येत आहेत.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘एनसीआरबी’च्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) माध्यमातून देश तसेच महत्त्वाच्या शहरांतील गुन्ह्यांची आकडेवारी जारी करण्यात येते. सर्वसाधारणत: पोलीस विभागाकडून माहितीच्या अधिकारातून मिळालेली माहिती व ‘एनसीआरबी’ची आकडेवारी सारखी असणे अपेक्षित आहे. परंतु २०१७ साली नागपूर शहरात महिलांवर नेमके किती अत्याचार झाले यासंदर्भातील वेगवेगळे आकडे दिसून येत आहेत. माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या आकडेवारीपेक्षा ‘एनसीआरबी’तील आकडेवारी ही दुपटीहून अधिक कमी आहे. त्यामुळे महिला अत्याचारांचे नेमके आकडे तरी किती असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘एनसीआरबी’ने काही दिवसांअगोदर २०१७ साली झालेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीचा अहवाल जारी केला. यानुसार नागपुरात २०१७ साली महिला अत्याचाराच्या एकूण ७२ प्रकरणांची नोंद झाली. दुसरीकडे उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना २१ फेब्रुवारी २०१८ रोजी नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून माहिती प्राप्त झाली होती. या अधिकृत माहितीनुसार २०१७ साली शहरात महिला अत्याचाराच्या १६६ गुन्ह्यांची नोंद झाली होती. ‘एनसीआरबी’ व माहिती अधिकारातील आकडेवारीत ९४ गुन्ह्यांची तफावत आढळून येत आहे. हा आकडा निश्चितच लहान नाही. अशा स्थितीत नेमकी खरी आकडेवारी कुणाची असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘सायबर’ गुन्ह्यांच्या आकडेवारीतदेखील फरक
२०१७ साली नागपुरात ‘सायबर क्राईम’चे ८२ गुन्हे नोंदविण्यात आले असे ‘एनसीआरबी’च्या आकडेवारीतून समोर येत आहे. परंतु नागपूर पोलिसांनी २२ आॅगस्ट २०१९ रोजी माहिती अधिकारातून दिलेल्या माहितीनुसार ही संख्या ८१ इतकी होती. याशिवाय २०१६ च्या आकडेवारीतदेखील फरक दिसून येत आहे. आकड्यांमध्ये फारसा फरक नसला तरी ‘एनसीआरबी’ व नागपूर पोलिसांची आकडेवारी सारखी असणे अपेक्षित आहे. आकडेवारीत ही तफावत अनेक प्रश्न उत्पन्न करणारी आहे.