एम्सच्या जागा तरी किती? प्रॉस्पेक्टस्मध्ये १०० जागांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:49 PM2019-02-25T22:49:29+5:302019-02-25T22:51:13+5:30
बहुप्रतीक्षित असलेल्या व राज्य शासनाचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ नागपूर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या(एम्स) पदवीच्या (एमबीबीएस)अभ्यासक्रमाला सुरुवात झाली. स्वत:ची स्वतंत्र इमारत नसल्याने ‘एम्स’चा अभ्यासक्रम मेडिकल कॉलेजमध्ये सुरू झाला. एमबबीएसच्या ५० जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. परंतु रविवारी ‘एम्स’ नवी दिल्लीने नागपूरसाठी चालू वर्षात १०० जागांवर प्रवेश देण्यात येणार असल्याचे ‘प्रॉस्पेक्टस्’ काढल्याने गोंधळ उडाला. विशेष म्हणजे, ‘एम्स’ इमारतीच्या बांधकामाला आणखी काही वर्षे लागणार असल्याने प्रशासन अडचणीत आले आहे; तर ‘एम्स’च्या जागा तरी किती, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहुप्रतीक्षित असलेल्या व राज्य शासनाचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ नागपूर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या(एम्स) पदवीच्या (एमबीबीएस)अभ्यासक्रमाला सुरुवात झाली. स्वत:ची स्वतंत्र इमारत नसल्याने ‘एम्स’चा अभ्यासक्रम मेडिकल कॉलेजमध्ये सुरू झाला. एमबबीएसच्या ५० जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. परंतु रविवारी ‘एम्स’ नवी दिल्लीने नागपूरसाठी चालू वर्षात १०० जागांवर प्रवेश देण्यात येणार असल्याचे ‘प्रॉस्पेक्टस्’ काढल्याने गोंधळ उडाला. विशेष म्हणजे, ‘एम्स’ इमारतीच्या बांधकामाला आणखी काही वर्षे लागणार असल्याने प्रशासन अडचणीत आले आहे; तर ‘एम्स’च्या जागा तरी किती, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
मिहानमधील २०० एकरमध्ये ‘एम्स’ उभारले जात आहे. बांधकाम पूर्ण होईपर्यंत नागपूर मेडिकल कॉलेजमधून ‘एम्स’चे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सप्टेंबर महिन्यापासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. एमबीबीएसच्या ५० जागेवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. ‘एम्स’च्या संचालकपदी डॉ. विभा दत्ता यांची नेमणूक होताच त्यांनी बांधकामाला गती दिली. परंतु बांधकाम कधी पूर्ण होणार, या प्रश्नाचे उत्तरही त्यांच्याकडे नाही.‘एम्स’चे अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले डॉ. पी. के. दवे यांनी जानेवारी महिन्यात संस्थेला भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत मिहानमध्ये इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने पुढील वर्षीही ५० जागांवरच प्रवेश देण्यात येईल, असे स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, ‘एम्स’च्या पहिल्या शैक्षणिक वर्षातच विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न उभा ठाकला होता. अखेर शासकीय दंत महाविद्यालयाने आपल्या वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांना दुसऱ्या वसतिगृहात सामावून घेतल्याने ‘एम्स’च्या विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय झाली. याशिवाय मेडिकलने ‘एम्स’ला उपलब्ध करून दिलेल्या वर्गखोल्या, विविध विषयांच्या प्रयोगशाळा, शिक्षकांना बसण्याची सोय ही केवळ ५० जागांना घेऊनच करण्यात आली आहे. यामुळे ‘प्रॉस्पेक्टस्’नुसार पुढील वर्षी १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास सर्वच व्यवस्था कोलमडून पडण्याची शक्यता आहे.
प्राप्त माहितीनुसार, मिहानमध्ये ‘एम्स’च्या इमारतीचे बांधकाम पूर्ण व्हायला साधारण चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. केवळ कॉलेजपुरत्या इमारतीचे बांधकाम म्हटले तरी पुढील वर्षापर्यंत ते पूर्ण होण्याची शक्यता नाही; सोबतच एवढ्या कमी वेळात प्रयोगशाळा उभारणे, ‘फॅकल्टी’ उभारणे कठीण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.