हा कसला पार्किं ग प्लाझा?
By admin | Published: June 22, 2017 01:57 AM2017-06-22T01:57:11+5:302017-06-22T01:57:11+5:30
सीताबर्डीसारख्या वर्दळीच्या भागात पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहतुकीची कोंडी होते.
नासुप्र्र झोपेत, नागरिक त्रस्त तर कशी सुटेल वाहतुकीची कोंडी ? आॅपरेटरकडून प्रतिसाद नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीताबर्डीसारख्या वर्दळीच्या भागात पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहतुकीची कोंडी होते. यावर पर्याय म्हणून नागपूर सुधार प्रन्यासने (नासुप्र) खासगी विकासकाच्या माध्यमातून व्हेरायटी चौकात अमरावती मार्गावर पार्किंग प्लाझाचे बांधकाम केले. २०१३ मध्ये हा प्रकल्प सुरू झाला. परंतु काही महिन्यातच पार्किंगची व्यवस्था बंद करण्यात आली. तीन वर्षांनी देखभालीसाठी नासुप्रकडे हा प्रकल्प हस्तांतरित करण्यात आला. परंतु तो बंदच असल्याने पार्किंग प्लाझा पांढरा हत्ती बनला आहे.
रॉय उद्योग समूहाने टीडीआरच्या मोबदल्यात हा प्रकल्प उभारला. येथे ७३ चारचाकी वाहने पार्किंग करण्याची सुविधा आहे. सुरुवातीला तीन वर्षे प्रायोगिक तत्त्वावर विकासकाने हा प्रकल्प चालवायचा होता. त्यानंतर यासाठी नवीन आॅपरेटर शोधण्याची नासुप्रची जबाबदारी होती.
परंतु गेल्या वर्षभरात नवीन आॅपरेटर शोधण्यात नासुप्रला यश मिळालेले नाही. नवीन आॅपरेटकडून प्रतिसाद नाही. त्यामुळे पार्किंग प्लाझा वापराविना पडून असल्याने नासुप्र हतबल असल्याचे चित्र आहे.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार प्रकल्पाचे बांधकाम सदोष आहे. त्यामुळे हा प्रकल्प चालविण्यासाठी कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नाही. मोठ्या आकाराच्या कार पार्किंग करताना अडचणी येतात. त्यामुळे हा प्रकल्प बंद पडला आहे. सीताबर्डी भागात चारचाकी वाहनधारकांना पार्किंगची सुविधा उपलब्ध व्हावी, सोबतच ग्राहकांवर जादा आर्थिक भुर्दंड पडणार नाही, असे दोन्ही हेतू साध्य करून हा प्रकल्प ‘ना नफा ना तोटा’ या धर्तीवर चालविणे अपेक्षित होते. मात्र यात अद्याप यश आलेले नाही. सीताबर्डी पसिरात पार्किंगसाठी प्रशस्त जागा उपलब्ध नसल्याने खासगी सहभागातून बहुमजली पार्किंगचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय नासुप्रने घेतला होता. प्रकल्प उभा राहिला परंतु आता तो चालवायचा कसा असा यक्षप्रश्न नासुप्रपुढे उभा ठाकला आहे. प्रकल्प सुरू राहावा, सोबतच याचा आर्थिक बोजा पडणार नाही अशा स्वरुपात प्रकल्प चालविण्यासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी दिली.