तर तलावाचे संरक्षण कसे होणार?
By Admin | Published: September 14, 2016 03:05 AM2016-09-14T03:05:36+5:302016-09-14T03:05:36+5:30
गणेश उत्सवात शहरातील एतिहासिक तलावाचे संरक्षण व्हावे म्हणून, गेल्या काही वर्षांपासून नागपूर महापालिका
स्वयंसेवी संस्थांचा असहकार : मनपाचा उद्देश सार्थ ठरण्यावर प्रश्नचिन्ह
नागपूर : गणेश उत्सवात शहरातील एतिहासिक तलावाचे संरक्षण व्हावे म्हणून, गेल्या काही वर्षांपासून नागपूर महापालिका आपल्या सर्व यंत्रणेसह उत्सवाच्या काळात सज्ज होते. लाखो रुपये त्यासाठी खर्चही करते. परंतु तरीही तलाव प्रदूषित होतात. कारण गणेशभक्तांची मानसिकता जोपर्यंत बदलणार नाही, तोपर्यंत तलावांचे संरक्षण शक्य नाही. ही मानसिकता बदलण्यासाठी शहरातील पर्यावरणवादी संस्थांनी मनपाच्या खांद्याला खांदा लावून काम करणे अपेक्षित आहे. परंतु यावर्षी मनपाचा प्रबोधनाचा हा खांदा कमकुवत ठरतो आहे. कधीकाळी तलावाच्या संरक्षणासाठी मोठ्या संख्येने पुढे येणाऱ्या पर्यावरणवादी संस्थांनी, यावर्षी सामूहिक कार्यातून फारकत घेतली आहे. त्यामुळे यंत्रणा सज्ज असूनही मनपाचा तलाव संरक्षणाचा उद्देश सार्थ ठरण्यावर प्रश्न निर्माण झाला आहे.
गणेशोत्सवात सर्वाधिक तलाव प्रदूषित होत असल्यामुळे मनपा आपल्या यंत्रणेसह प्रदूषण रोखण्यासाठी सज्ज झाली आहे. मनपा आरोग्य विभागाच्या नियंत्रणात तलाव बचाव अभियान राबविण्यात येत आहे. शहरात जवळपास दीड ते दोन लाख मूर्तीची स्थापना झाली आहे. मंडळाच्या मूर्तींना पर्याय नसल्याने, घरगुती गणपतीचे विसर्जन तरी टाळता यावे यासाठी मनपाने यावर्षी गणेशोत्सवात १२५ कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. शहरातील तलावाच्या स्थळी प्रत्येक चौकात, सार्वजनिक ठिकाणी, उद्यान एवढेच नव्हे तर, गणेशभक्तांच्या घरी जाऊन विसर्जनाची व्यवस्था केली आहे. दरवर्षी अशीच यंत्रणा सज्ज असते. परंतु तरीही श्रद्धेपोटी गणेशभक्त तलावातच मूर्ती विसर्जित करतात. सामाजिक संस्थांमुळे घरगुती गणपतींचे तलावात होणारे विसर्जन टाळता येऊ शकते. निर्माल्यामुळे होणारे प्रदूषणही रोखता येऊ शकते. कारण प्रबोधनाचे मोठे काम या संस्थांकडून करण्यात येते.
परंतु यावर्षी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग मंदावल्याचे दिसते आहे. आतापर्यंत मनपाकडे या कार्यात केवळ सात स्वयंसेवी संस्थांनी सहभागी होण्याचे आश्वस्त केले आहे. तेही विसर्जनाच्या अंतिम दिवशी. शहरातील सहा तलावात विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे जेवढ्या जास्त स्वयंसेवी संस्था सहभागी होतील, तेवढे तलावाचे प्रदूषण टाळता येईल. यावर्षी ते शक्य होताना दिसत नाही. मुळात स्वयंसेवी संस्थांना या कार्यात रस राहिलेला नाही, मनपाकडून त्यांचा अपेक्षित सन्मान होत नाही, त्यामुळे प्रतिसाद अल्प दिसतो आहे. परिणामी मनपाची यंत्रणा असतानाही तलावाचे संरक्षण ही सामाजिक चळवळ होऊ शकली नाही. (प्रतिनिधी)