१०० कोटींचा निधी कसा उभारणार ?
By admin | Published: October 20, 2015 03:47 AM2015-10-20T03:47:33+5:302015-10-20T03:47:33+5:30
एलबीटी रद्द करण्यात आल्यानंतर महापालिके तील कर्मचाऱ्यांचे वेतन एक महिना उशिराने होत आहे. दिवाळी अग्रीम
नागपूर : एलबीटी रद्द करण्यात आल्यानंतर महापालिके तील कर्मचाऱ्यांचे वेतन एक महिना उशिराने होत आहे. दिवाळी अग्रीम देण्यासाठी २५ कोटींचे कर्ज घेण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. अशा परिस्थितीत सिमेंट रस्त्यासाठी १०० कोटींचा निधी कसा उभारावा असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. त्यातच स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी महापालिकेला दर वर्षाला ५० कोटींचा निधी उभारावा लागणार आहे. असे असतानाही प्रकल्पाला विलंब होत नसल्याचा दावा पदाधिकारी व अधिकारी करीत आहेत. काही महिन्यापूर्वी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील सिमेंट रस्त्यांची घोषणा केली होती. यातील पहिल्या टप्प्यातील कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. २५ किलोमीटर लांबीच्या रिंगरोडच्या सिमेंटीकरणासाठी केंद्र सरकारकडून २९४ कोटी मंजूर करण्यात आले आहेत.
तसेच शहरातील ४४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ४३४ कोटीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यामुळे शहातील सिमेंट रस्त्यांचे काम केव्हा सुरू होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)
पहिल्या टप्प्यातील काम अर्धवट
माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या कार्यकाळात ३० किलोमीटरच्या सिमेंट रस्त्यांची योजना तयार करण्यात आली होती. यावर १०० कोटीचा खर्च गृहीत धरण्यात आला होता. दोन वर्षात हे काम पूर्ण करावयाचे होते. या कामाच्या भूमिपूजनाला चार वर्षे झाली. परंतु अद्याप अर्धेही काम झालेले नाही. त्यामुळे शहरातील सिमेंट रस्त्याचे काम केव्हा सुरू होणार, अशी चर्चा आहे.