दीक्षाभूमीवर कसे पोहोचणार अनुयायी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 01:39 AM2017-09-08T01:39:30+5:302017-09-08T01:41:38+5:30
संपूर्ण शहरात सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी अर्धवट कामे झाली आहेत. या कामांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. परंतु येणाºया काही दिवसांत सर्वात जास्त अडचण ही दीक्षाभूमी परिसरात होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संपूर्ण शहरात सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी अर्धवट कामे झाली आहेत. या कामांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. परंतु येणाºया काही दिवसांत सर्वात जास्त अडचण ही दीक्षाभूमी परिसरात होणार आहे. कारण धम्मचक्र प्रवर्तन दिवस काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. असे असताना दीक्षाभूमीच्या सभोवताल सिमेंट रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत असल्याने लाखो संख्येने येणारे आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमीवरील स्मारकात पोहोचणार तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
येत्या ३० सप्टेंबर रोजी अशोक विजयादशमी आहे. त्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात येणार येईल. साहजिकच यंदाही देश-विदेशातील लाखोंच्या संख्येने बौद्ध-आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमीवर येतील. परंतु यावर्षी दीक्षाभूमीच्या सभोवताल सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या कामांमुळे आंबेडकरी अनुयायांना मोठा त्रास होण्याची शक्यता आहे. सर्वात मोठी समस्या ही राहाटे कॉलनी चौक ते लक्ष्मीनगर चौकादरम्यान सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या अर्धवट कामामुळे निर्माण होणार आहे. या रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. एका बाजूचा सिमेंट रस्ता पूर्ण झाला, परंतु फुटपाथचे काम झालेले नाही. अण्णाभाऊ साठे चौकापासून तर लक्ष्मीनगर चौकापर्यंत दीक्षाभूमीच्या सुरक्षा भिंतीला लागून असलेल्या फुटपाथचे काम व्हायचे आहे. हा मुख्य रस्ता आहे. चित्रकला महाविद्यालयाच्या दिशेने असणारे दीक्षाभूमीचे गेट आहे. या गेटला लागून असलेले फुटपाथचे काम व्हायचे आहे. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनी या गेटमधून अनुयायांना प्रवेश दिल्यास अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.
दुसरा महत्त्वाचा रस्ता म्हणजे रामदासपेठ चौक ते काचीपुरा चौक दरम्यान एका बाजूने सिमेंट रस्त्याचे काम अजूनही अर्धवट अवस्थेतच आहे. तसेच काचीपुरा ते बजाजनगर चौक दरम्यान एका बाजूने रस्ता झाला असला तरी, कृषी विभागाच्या दिशेने असलेला रस्ता अजूनही अर्धवटच आहे. या रस्त्यांमुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी आंबेडकरी अनुयायांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.
सामाजिक कार्यांना अडचण
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी येणाºया अनुयायांसाठी अनेक सामाजिक संघटनांतर्फे सामाजिक सेवा पुरविली जाते. राहाटे कॉलनी चौक ते अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत दोन्ही बाजूंना दुकाने असतात तसेच सामाजिक जाणिवेतून विविध संघटनांचे स्टॉल लावलेले असतात. यातच चोखामेळा वसतिगृह परिसरात छोटेखानी रुग्णालय तयार केले जाते. या रुग्णालयात नि:शुल्क वैद्यकीय सेवा पुरविली जते. नेमका याच बाजूचा सिमेंट रस्ता अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे या ठिकाणी यंदा रुग्णालय उभारत येईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कृषी विभागाच्या जागेतील चौथा रस्ता सुरू राहील का?
दीक्षाभूमीवरील मध्यवर्ती स्मारकाकडे जाण्यासाठी तीन मुख्य रस्ते आहेत. एक दीक्षाभूमीचे मुख्य गेट, दुसरा चित्रकला महाविद्यालयाच्या दिशेने आणि तिसरा एमबीए कॉलेजच्या बाजूने आहे. हे तिन्ही गेट नियमितपणे सुरू असतात. याशिवाय एक चौथा रस्ता आहे. तो म्हणजे काचीपुरा येथून कृषी विभागाच्या वसतिगृहातून जातो. परंतु हा रस्ता केवळ धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी विनंतीनुसार सुरू केला जातो. यंदा या बाजूच्या सिमेंट रोडचे काम सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता सुरू राहील की नाही, यावरच प्रश्नचिन्ह लागले आहे.
राष्ट्रपतीही देणार भेट
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे लवकरच नागपूर दौºयावर येत आहेत. ड्रॅगन पॅलेस येथील विपश्यना केंद्र व रेशीमबाग चौकातील नवनिर्मित सुरेश भट सभागृहाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपतींच्या दौºयाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र या भेटीत ते दीक्षाभूमीला आवर्जून भेट देणार असल्याची माहिती आहे. तेव्हा राष्ट्रपतींना दीक्षाभूमीवर आणतानाही या सिमेंट रस्त्यांची मोठी अडचण निश्चितच होणार.
बस पार्किंगची व्यवस्था कुठे करणार?
दीक्षाभूमीवर दरवर्षी अनुयायांना ने-आण करणाºया शहर बस व बाहेरगावावरून येणाºया वाहनांची व्यवस्था ही विद्यापीठ लायब्ररी ते अलंकार टॉकीज चौक आणि अलंकार टॉकीज चौक ते शंकरनगर चौक तसेच वर्धा रोडने येणाºया वाहनांची व्यवस्था नीरीच्या रस्त्यावर केली जाते. परंतु यावेळी या सर्व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. कुठे सिमेंट रस्त्यांची कामे तर कुठे मेट्रो रेल्वेची कामे सुरू आहेत. त्यामुळे असलेला रस्ता आधीच अरुंद झाला आहे. त्यामुळे बसेस कुठे पार्क होतील? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
अपघात होऊ शकतो
धम्मचक्र प्रवर्तन दिनाला आता काही दिवस उरले आहे. सिमेंट रोडची कामे व्हायची आहे. त्यामुळे समस्या तर होणार आहे. सिमेंट रोडची अर्धवट कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी एकादा अपघात किंवा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे किमान दीक्षाभूमीला लागून असलेल्या सिमेंट रस्ते व फुटपाथची कामे तरी ३० तारखेपूर्वी पूर्ण व्हावीत.
- विलास गजघाटे, सदस्य,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती
पोलीस व प्रशासनाची वाढणार डोकेदुखी
सिमेंट रोड व मेट्रो रेल्वेच्या कामामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी निश्चितच अनुयायांना मोठा त्रास होणार आहे. दीक्षाभूमी स्मारकापर्यंत सुरळीत पोहोचणे व बाहेर येणे जिकीरीचेच काम ठरणार आहे. अनुयायांना हा त्रास होणार असला तरी वाहतुकीसह एकूणच व्यवस्था सांभाळताना पोलीस व प्रशासनाची मोठी डोकेदुखी वाढणार आहे.