-तर कशी करणार पदभरती ? रिक्त पदांची माहितीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 03:33 PM2018-01-16T15:33:39+5:302018-01-16T15:36:44+5:30
राज्यातील कुठल्याही शासकीय विभागातील पदे रिक्त राहणार नाही, असा दावा राज्य सरकारतर्फे करण्यात आला आहे. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. पद भरण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) शासकीय विभागांकडून रिक्त पदे भरण्याची मागणी वेळेवर येत नाही. त्यामुळे राज्यातील सर्वच शासकीय विभागांमध्ये वर्ग एक ते वर्ग तीन पर्यंतची अनेक पदे रिक्त आहेत.
आशिष दुबे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील कुठल्याही शासकीय विभागातील पदे रिक्त राहणार नाही, असा दावा राज्य सरकारतर्फे करण्यात आला आहे. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. पद भरण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) शासकीय विभागांकडून रिक्त पदे भरण्याची मागणी वेळेवर येत नाही. त्यामुळे राज्यातील सर्वच शासकीय विभागांमध्ये वर्ग एक ते वर्ग तीन पर्यंतची अनेक पदे रिक्त आहेत.
एमपीएससीचे सदस्य चंद्रशेखर ओक यांनीच हा धक्कादायक खुलासा केला आहे. ओक हे राज्य सीईटी सेलचे आयुक्तसुद्धा राहिलेले आहे हे विषेश. ओक हे सोमवारी नागपुरात आले होते. त्यावेळी लोकमतशी त्यांनी विशेष संवाद साधला. ओक यांनी सांगितले की, शासकीय विभागांकडून येणाऱ्या मागणीप्रमाणे आयोगामार्फत रिक्त पदांच्या परीक्षांचे आयोजन केले जाते. परीक्षेचा कार्यक्रम निश्चित करण्यापूर्वी एक वर्षाअगोदरच सर्व विभागांना यासंबंधात पत्र पाठविले जाते. त्यांच्याकडून माहिती घेतली जाते की कोणत्या वर्गाची किती पदे रिक्त आहेत. विभागांकडून मिळणाºया माहितीच्या आधारावरच पद भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाते. उमेदवारांकडून अर्ज मागविले जातात. एकदा ज्या पदांची भरती प्रक्रिया सुरू होते, ती पूर्ण करण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागतो. या प्रक्रियेदरम्यान केवळ तीच पदे भरली जातात, ज्या पदांची मागणी विभागांकडून करण्यात आलेली असते.
तर कशी करणार पदभरती ?
गेल्या वर्षी उपजिल्हाधिकारी व इतर समकक्ष पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. तेव्हा ४०० पदे भरण्यासाठी परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी केवळ ७० पदांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. याचा अर्थ असा नव्हे की पदे कमी झालेली आहेत. विविध विभागांकडून इतकेच पद रिक्त असल्याची माहिती आलेली आहे. ती भरण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. पद भरण्यासाठी आयोगाकडून विलंब होत असल्याचे त्यांनी खंडन केले. आयोग सर्व परीक्षांचा कार्यक्रम अगोदर निश्चित करीत असतो. त्याला वेबसाईटवरही टाकले जाते. त्यानुसारच पदे भरली जातात.
आॅनलाईन परीक्षा घेण्याचा विचार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षा आॅफलाईन असतात. येणाऱ्या वर्षात ही परीक्षा आॅनलाईन घेण्याबाबात आयोग विचार करीत आहे. सुरुवातीला कमी उमेदवार असलेल्या परीक्षा आॅनलाईन घेतल्या जातील. पुढे एकेक करीत इतर परीक्षा आॅनलाईन घेण्यात येतील, असेही ओक यांनी सांगितले.