उपराजधानीत महिला किती सुरक्षित ?
By admin | Published: January 4, 2015 12:54 AM2015-01-04T00:54:20+5:302015-01-04T00:54:20+5:30
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचे प्रकार घडले. १ जानेवारीच्या सकाळी ९ वाजता १७ वर्षांची मुलगी तिच्या अंगणात उभी होती.
कळमन्यात दोघींचा विनयभंग: आरोपींचा शोध सुरू
नागपूर : कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचे प्रकार घडले.
१ जानेवारीच्या सकाळी ९ वाजता १७ वर्षांची मुलगी तिच्या अंगणात उभी होती. आरोपी अनुराग बन्सोड तेथे आला. त्याने तिचा हात पकडून तिला जबरदस्तीने ब्रेसलेट घालून देण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध करून आरडाओरड केल्यामुळे आरोपी पळून गेला. दुसरी घटना २ जानेवारीच्या रात्री ७.३० वाजता कळमन्यातच घडली. १५ वर्षीय मुलगी तिच्या अंगणात उभी असताना आरोपी कैलास चंदबली शाहू (वय १८), दीनदयाल ऊर्फ देवा उमाशंकर मोहारे (वय १८) आणि नीलेश ऊर्फ नीलू सीताराम वर्मा (वय १९) तेथे आले. आरोपींनी पीडित मुलीला अश्लील शिवीगाळ केली. शाहूने तिच्याशी झोंबाझोंबी करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला असता तिला मारहाण करून शिवीगाळ केली. आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी गोळा झाली. ते पाहून आरोपी पीडित मुलीला पाहून घेण्याची धमकी देत पळून गेले. या दोन्ही प्रकरणात कळमना पोलिसांनी विनयभंग तसेच बालकांचे लंैगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल केले. महिला उपनिरीक्षक गुजर आरोपींचा शोध घेत आहेत.
अल्पवयीन मुलीला पळविले
अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या आरोपावरून वर्धा जिल्ह्यातील एका तरुणाचा एमआयडीसी पोलीस शोध घेत आहेत.२
१७ वर्षीय मुलगी ३१ डिसेंबरच्या दुपारी ४ वाजता चुलत भावाच्या घरी जाते असे सांगून, घरून निघाली. ती परतच आली नाही. तिला विकास तुळसीराम नैताम (वय २२, रा. परसोडी, सेलू, जि. वर्धा) याने पळवून नेले असावे, असा संशय व्यक्त करून पीडित मुलीच्या पालकांनी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विकास आणि बेपत्ता मुलीचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)