कसा राहणार पोलिसांवर ‘भरोसा’?
By admin | Published: June 30, 2017 02:53 AM2017-06-30T02:53:11+5:302017-06-30T02:53:11+5:30
मागीलवर्षी ज्येष्ठ नागरिकांवरील झालेल्या प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांमुळे शहर हादरले होते.
ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी तिघांचा ‘स्टाफ’ : सव्वापाच वर्षांत केवळ साडेतीन हजार नागरिकांना ‘कार्ड’वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागीलवर्षी ज्येष्ठ नागरिकांवरील झालेल्या प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांमुळे शहर हादरले होते. गेल्या काही काळापासून ज्येष्ठ नागरिकांच्यासंदर्भातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. मात्र तरीदेखील पोलीस प्रशासनाने यातून बहुतेक धडा घेतलेला नाही. म्हणूनच की काय ‘भरोसा सेल’मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी अवघ्या तीन जणांचा ‘स्टाफ’ कार्यरत आहे. विशेष म्हणजे शहरात लाखो ज्येष्ठ नागरिक असताना मागील सव्वापाच वर्षांत केवळ साडेतीन हजारांच्या आसपासच नागरिकांचे ‘कार्ड’ तयार करण्यात आले आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत नागपूर पोलिसांच्या गुन्हेशाखेकडे विचारणा केली होती. भरोसा सेलच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेले ‘कार्ड’ तसेच दामिनी पथकाला देण्यात आलेल्या सुविधा इत्यादींबाबत त्यांनी विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी ‘भरोसा सेल’मध्ये केवळ एक अधिकारी व दोन कर्मचारी कार्यरत आहेत. ‘भरोसा सेल’तर्फे ज्येष्ठ नागरिकांना विशेष ‘कार्ड’ देण्यात येते. १ जानेवारी २०१२ ते ३० एप्रिल २०१७ या कालावधीत पोलीस विभागातर्फे केवळ ३,६६२ ज्येष्ठ नागरिक ‘कार्ड’ वितरित करण्यात आले. तर या कालावधीत केवळ ३७२ नागरिकांना प्रत्यक्ष मदत देण्यात आली. मागील पाच वर्षात चक्क ३८ ज्येष्ठ नागरिकांची हत्या करण्यात आली. तर फसवणूक व मारहाणीचे प्रमाणदेखील वाढीस लागले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेवर विशेष भर देण्यात येईल, असा दावा अधिकाऱ्यांतर्फे करण्यात आला होता.अशा स्थितीत माहितीच्या अधिकारातील ही आकडेवारी पोलिसांच्या दाव्यांची ‘पोलखोल’ करणारीच आहे.