‘डेल्टा प्लस’ला कसे रोखणार? दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या अत्यल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 10:51 AM2021-07-03T10:51:48+5:302021-07-03T10:52:14+5:30
Nagpur News राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २१ रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. या रुग्णांचे लसीकरण झाले नसल्यामुळे विषाणूची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे असताना, नागपूर जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण फार कमी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २१ रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. या रुग्णांचे लसीकरण झाले नसल्यामुळे विषाणूची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे असताना, नागपूर जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण फार कमी आहे. ४२ लाख लोकसंख्येच्या तुलनेत मात्र मागील सहा महिन्यात पहिला आणि दुसरा डोस मिळून १५,३६,८४१ (३६.५९ टक्के), तर दुसऱ्या डोसचे केवळ ३,४३,३६४ लोकांचे लसीकरण झाले. धक्कादायक म्हणजे, लसीचा तुटवडा पडल्याने मागील चार दिवसांपासून लसीकरणच बंद आहे.
कोरोना विषाणूचा ‘डेल्टा’ हा उत्परिवर्तित प्रकार अत्यंत संसर्गजन्य आहे. आतापर्यंत ८५ देशांमध्ये विषाणूचा हा प्रकार आढळला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक टेद्रोस अदहानम गेब्रेयेसस यांनी लसीकरण न झालेल्यांमध्ये त्याचा वेगाने पसार होत असल्याचा इशारा दिला आहे. या विषाणूचा संसर्ग आणि त्यातून होणारे मृत्यू रोखण्याचा लसीकरण हा एकमेव परिणामकारक मार्ग आहे. लसीकरण न झालेल्यांमध्ये विषाणू वेगाने पसरत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यात लसीकरणाचा वेग मंदावलेला असल्याने मोठा धोका होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
- दुसरा डोस घेण्याचे प्रमाण केवळ ८ टक्के
नागपूर जिल्ह्यात ११,९३,४७७ लोकांनी पहिला डोस घेतला असला तरी लोकसंख्येच्या तुलनेत केवळ ८.१७ टक्के म्हणजे, ३,४३,३६४ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. यात हेल्थ लाइन वर्करमध्ये ३६,३२४, फ्रंट लाइन वर्करमध्ये ३९,५६४, १८ ते ४४ वयोगटात ८,९६३, ४५ ते ६० वयोगटात १,१२,३०६ तर ६० वर्षांवरील वयोगटात १,४६,२०७ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. हा डाेेस झाल्याच्या १४ दिवसांनंतर अॅण्टिबॉडीज वाढत असल्याने या लसीकरणाकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
- १८ ते ४४ वयोगटात ८,९६३ तरुणांनी घेतला दुसरा डोस
१८ वर्षांवरील तरुणांसाठी १ मेपासून लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणाला चांगला प्रतिसादही मिळत होता. परंतु लसीच्या तुटवड्यामुळे बारा दिवसांतच हे लसीकरण बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली. आता पुन्हा या वयोगटावरील लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी लसीचा तुटवड्यामुळे मागील चार दिवसांपासून लसीकरण बंद आहे. ३० जूनपर्यंत १८ ते ४४ या वयोगटातील २,०३,९९७ तरुणांना लसीचा पहिला डोस, तर ८,९६३ तरुणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला.