कशी घेणार ‘गरुड’ झेप ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2016 02:48 AM2016-06-27T02:48:52+5:302016-06-27T02:48:52+5:30

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टी कामाला लागली आहे. ज्येष्ठ नेते दिवस-रात्र

How to take 'Garuda' leap? | कशी घेणार ‘गरुड’ झेप ?

कशी घेणार ‘गरुड’ झेप ?

Next

संघटन आहे कुठे ? : बसपा प्रदेशाध्यक्षांचा सवाल
नागपूर : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टी कामाला लागली आहे. ज्येष्ठ नेते दिवस-रात्र संघटना बांधणीवर भर देत आहेत. नागपुरात बसपा महापौर बनाओ अभियान राबविणार आहे. परंतु नागपूर शहर व जिल्ह्याच्या संघटनेची बांधणीच अजून पूर्ण झाली नसल्याची बाब रविवारी उघडकीस आली. खुद्द प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी यासंदर्भात भरसभेत जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली.
बसपाने महाराष्ट्रात आजवर विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपला एकही उमेदवार निवडून दिला नसला तरी, मजबूत संघटनेच्या जोरावर बसपा विशेषत: विदर्भामध्ये एक सक्षम पर्याय म्हणून नेहमीच राहिलेला आहे. आजवर अनेक नेते आले आणि गेले परंतु बसपाच्या संघटनेवर विदर्भात तरी त्याचा कधीही परिणाम झालेला नाही. परंतु यावेळचे चित्र मात्र उलटे आहे. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहिलेले डॉ. सुरेश माने यांनी पक्ष सोडल्यापासून बसपाच्या संघटनेलाच खीळ बसली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते ही बाब जाहीररीत्या मान्य करायला तयार नाहीत. मात्र बसपाचे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रभारी खा. वीरसिंह आणि प्रदेशाध्यक्ष विलास गरुड मागील सहा महिन्यांपासून ज्या पद्धतीने विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये दौरा करीत फिरत आहेत, त्यावरून विदर्भात संघटनेला मोठ्या प्रमाणावर खीळ बसल्याचे दिसून येते. हे दोन्ही ज्येष्ठ नेते संघटना बांधणीसाठी दिवस-रात्र एक करीत आहेत. परंतु तरीही संघटना बांधणी अजूनही पूर्ण झाली नाही, याचे चित्र रविवारी दिसून आले.
रविवारी पक्षातर्फे राजर्षी शाहू महराज यांच्या जयंतीनिमित्त माहेश्वरी सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रदेशाध्यक्ष गरुड यांनी संघटना बांधणीचा आढावा घेतला. नागपूर शहर व जिल्ह्यातील विधानसभानिहाय आढावा घेतला. प्रत्येक विधानसभेतील पदधिकाऱ्यांना उभे राहण्यास सांगण्यात आले. यावेळी विधानसभानिहाय पदाधिकाऱ्यांची संख्या विचारात घेता संघटन बांधणी अजूनही झाली नसल्याची बाब गरुड यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी याबाबत जाहीरपणेच आपली नाराजी व्यक्त केली. महापुरुषांची जयंती साजरी करीत आहोत, पण संघटना बांधणी तयार नाही, अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रीय महासचिव आणि प्रदेशाध्यक्षांच्या समोरच नागपूरचे पदधिकारी संघटना बांधणीबाबत उघडे पडले. तेव्हा अजूनपर्यंत संघटना बांधणीच नाही, तर बसपाचा हत्ती धावणार कसा, असा प्रश्न येथे आलेल्या सामान्य कार्यकर्त्यांना पडला होता. (प्रतिनिधी)

Web Title: How to take 'Garuda' leap?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.