टरबुजातील ‘केमिकल लोचा’ कसा ओळखाल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2023 08:45 AM2023-03-28T08:45:00+5:302023-03-28T08:45:01+5:30
Nagpur News ऊन वाढताच चवीला गोड आणि पोटाला थंडावा देणाऱ्या टरबुजाची मागणी वाढली आहे. परंतु, कच्चे टरबूज केमिकल वापरून लाल करून विकले जात असल्याच्या तक्रारी आहेत.
नागपूर : ऊन वाढताच चवीला गोड आणि पोटाला थंडावा देणाऱ्या टरबुजाची मागणी वाढली आहे. परंतु, कच्चे टरबूज केमिकल वापरून लाल करून विकले जात असल्याच्या तक्रारी आहेत. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) यावर लक्ष ठेवून आहे. लवकरच ते तपासणी मोहीम हाती घेणार आहेत.
- उन्हाळ्यात टरबूज उपयोगी
टरबुजामध्ये ९२ टक्के पाणी असते, जे उन्हाळ्यात शरीराला डिहायड्रेशनपासून दूर ठेवण्यास मदत करते. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन-बी ६, व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम आणि लायकोपीन आणि सिट्रुलीन यांसारखी प्लँट केमिकल असल्यामुळे टरबूज आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
- लाल टरबूज कसे ओळखाल
:: कच्चे टरबूज गडद रंगाचे असते आणि त्याच वेळी थोडे अधिक चमकदार असते, तर चांगले पिकलेले टरबूज इतके चमकदार नसते
:: पिकलेल्या टरबुजाचे देठ सुकलेले असते.
:: पिकलेले टरबूज वाजवून पाहिले असता विशिष्ट आवाज ऐकू येतो.
:: पिकलेल्या टरबुजाची एक बाजू जमिनीला टेकलेली असल्याने तिथे पिवळा रंग दिसतो. हा पिवळा रंग जितका जास्त तितके टरबूज चांगले.
-२०रुपये किलो
सध्या बाजारात २० ते ३० रुपये किलो दराने टरबूज उपलब्ध आहेत. मार्केट वाढल्यास हा भाव १५ ते २० रुपयांतपर्यंत येणार असल्याची शक्यता व्यावसायिक वर्तवित आहेत. सध्या बहुसंख्य बाजार टरबुजाने व्यापल्याचे दिसून येत आहे.
-केमिकल वापरून केले जाते लाल
टरबूज पिकविण्यासाठी स्टेरॉइड इंजेक्शनचा वापर केला जातो. यामुळे टरबुजांमधील तंतूचे जाळे भरीव न राहता तुटक-तुटक राहते. काही विक्रेते कच्च्या टरबूजला आतून लाल करण्यासाठी केमिकलचा वापर करतात. परंतु याचे प्रमाण कमी असल्याचे एका व्यावसायिकाने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले.
-अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष
उन्हाळी फळांच्या मोसमाला आता कुठे सुरुवात झाली आहे. आंबा, टरबूज, अननस, खरबूज बाजारात दिसू लागले आहेत. अन्न व औषध प्रशासन या फळांकडे लक्ष ठेवून आहेत. आवक वाढताच या सर्वांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत.
टरबुजाची अशी करा तपासणी
:: केमिकल वापरलेल्या टरबुजामध्ये पिवळा रंग दिसत नाही.
:: शिवाय त्याचे देठही हिरवेच असते.
:: वेडेवाकडे, मध्येच दबलेले, खड्डा असलेले टरबूज टाळले पाहिजे.
:: टरबूज खाण्यापूर्वी १० ते १५ मिनिटे पाण्यात ठेवायला हवे
:: त्यामुळे त्याला लागलेले केमिकल्स निघून जातात.
-लवकरच तपासणी मोहीम
मोसमी फळांना सुरुवात झाली आहे. लवकरच यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात येईल. या वर्षी पहिल्यांदाच टरबुजाची तपासणी केली जाईल. नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले जाईल. तूर्तास केमिकल वापरून फळे पिकविण्याची तक्रार नाही.
-सुरेश अन्नपुरे, सहआयुक्त अन्न व औषधी प्रशासन