संघावर टीका करणाऱ्या आमदारांसोबत जुळवून कसे घेणार? भाजप आमदारांसमोर सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2023 08:00 AM2023-07-15T08:00:00+5:302023-07-15T08:00:06+5:30

Nagpur News राष्ट्रवादीतील काही आमदारांनी मागील काही काळात सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीकेची भूमिका घेतली होती. अशा आमदारांसोबत जुळवून कसे घ्यायचे व वैचारिक समन्वय कसा साधायचा असा प्रश्न भाजप सदस्यांना पडला आहे.

How to reconcile with MLAs who criticize the Sangh? Questions before BJP MLAs | संघावर टीका करणाऱ्या आमदारांसोबत जुळवून कसे घेणार? भाजप आमदारांसमोर सवाल

संघावर टीका करणाऱ्या आमदारांसोबत जुळवून कसे घेणार? भाजप आमदारांसमोर सवाल

googlenewsNext

योगेश पांडे

नागपूर : राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर आता विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला १७ जुलैपासून सुरुवात होत आहे. सध्याच्या राजकीय स्थितीत हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र नागपूर जिल्ह्यातील आमदारांसमोर मात्र वेगळाच पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीतील काही आमदारांनी मागील काही काळात सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीकेची भूमिका घेतली होती. अमोल मिटकरींनी तर कधीही संघविचारधारा स्वीकारू शकतच नाही, असे नुकतेच वक्तव्य केले. अशा आमदारांसोबत जुळवून कसे घ्यायचे व वैचारिक समन्वय कसा साधायचा असा प्रश्न भाजप सदस्यांना पडला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भाजप-शिवसेना युतीसोबत आल्याने आता विधानसभा व विधानपरिषदेतील आसन व्यवस्थादेखील बदलणार आहे. महायुतीत सहभागी असलेले राष्ट्रवादीचे आमदार आता सत्तापक्षाच्या बाकांवर बसतील. २०१९ पासून जेवढीही अधिवेशने झाली त्यात भाजप व राष्ट्रवादीच्या काही आमदारांमध्ये सभागृहात कलगीतुरा रंगल्याचे दिसून आले. याशिवाय सभागृहाबाहेरदेखील आरोप-प्रत्यारोप चालत राहिले. आता पक्षनेतृत्वानेच भूमिका घेतल्याने आमदारांना राष्ट्रवादीच्या सदस्यांसोबत बसावे लागणार आहे. आम्ही सोबत असलो तरी संघाची विचारधारा कधीच स्वीकारणार नाही, असे वक्तव्य नुकतेच मिटकरी यांनी केले होते. अशा स्थितीत मिटकरीसारख्या संघावर सातत्याने टीका करणाऱ्या आमदारासोबत कसे काय जुळवून घ्यायचे व सुसंवाद कसा साधायचा असा प्रश्न नागपुरातील भाजप आमदारांना पडला आहे.

मिटकरींकडून हेडगेवार स्मारकाला विरोध

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण होत असल्याने नागपुरात स्मारक उभारायची भाजप आमदारांची भूमिका होती. याबाबत भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी विधानपरिषदेत मागणी उचलून धरली होती. मात्र राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी त्या मागणीला जोरदार विरोध केला होता. त्यामुळे आता दोन्ही पक्ष सोबत आल्यानंतर अशा मुद्यांवर राष्ट्रवादीची भूमिका काय असेल असा संभ्रम भाजप आमदारांमध्ये आहे.

पक्षनेतृत्वावर विश्वास, सोबत काम करणार

या मुद्यावर भाजपचा कुठलाही आमदार सार्वजनिकपणे बोलण्यास तयार नाही. मात्र मिटकरीसारख्या आमदारांसोबत जुळवून घेणे ही मोठी परीक्षाच असणार असल्याचे अनौपचारिक चर्चेत आमदार मान्य करत आहेत. राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी भूतकाळात केलेल्या टीकाटिप्पणीमुळे निश्चितच त्यांच्यासोबत काम करणे आव्हान राहणार आहे. मात्र पक्षनेतृत्वाने घेतलेल्या भूमिकेसोबतच सर्व आमदार आहेत व त्यांच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आमच्याकडून तरी आम्ही राष्ट्रवादीच्या आमदारांना पूर्ण सहकार्य करू, असे एका आमदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Web Title: How to reconcile with MLAs who criticize the Sangh? Questions before BJP MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.