१०८ कोटींचा निधी आठ दिवसात कसा खर्च करणार? जि.प. प्रशासनापुढे पेच
By गणेश हुड | Published: February 8, 2024 06:53 PM2024-02-08T18:53:32+5:302024-02-08T18:54:56+5:30
जनसुविधा व नागरी सुविधा लेखाशीर्ष अंतर्गत शासनाकडून जिल्हा परिषदेला कोट्यवधींचा निधी मिळतो.
नागपूर: जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध योजनांसाठी १०८ कोटींचा निधी गेल्या सोमवारी जिल्हा परिषदेच्या खात्यात वळता करण्यात आला आहे. अगामी लोकसभा निवडणूक विचारात घेता प्राप्त निधी १५ फेब्रुवारीपर्यत खर्च करण्याच्या सूचना जि.प. प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. परंतु आठवडाभरात हा निधी खर्च कसा होणार असा प्रश्न विभाग प्रमुखांना पडला आहे. जनसुविधा व नागरी सुविधा लेखाशीर्ष अंतर्गत शासनाकडून जिल्हा परिषदेला कोट्यवधींचा निधी मिळतो. सर्वसाधारण सभेत जनसुविधा व नागरी सुविधांच्या निधीवरुन सत्ताधारी व प्रशासनात चांगलाच वाद निर्माण झाला होता.
आर्थिक वर्ष संपण्याला पावनेदोन महिन्यांचा कालावधी असला तरी अगामी लोकसभा निवडणुकीची आचार संहिता पुढील काही दिवसात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचार संहिता लागण्यापूर्वी मंजुरी व कार्यादेश न झाल्यास हा निधी अखर्चित राहण्याची शक्यता आहे. तीन दिवसापूर्वी जनसुविधासाठी २० कोटी तर नागरीसुविधासाठी २४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याने प्रशासनाची धावपळ सुरू आहे. नागरी सुविधा व जनसुविधासोबतच शिक्षण विभाग, पाधन रस्ते आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बाांधकामासाठी हा निधी प्राप्त झाला आहे.