नाटकच नाही तर नाटकवाले कसे जगतील?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 11:28 AM2020-06-15T11:28:39+5:302020-06-15T11:31:04+5:30
नाटकाच्या ओढीने नाटकवाले तयार होत असतात आणि नाटकच होणार नसेल तर नाटकवाले जगतील कसे, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
प्रवीण खापरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुठल्याही संकटाचे दोन पैलू असतात. एक तात्काळ निर्माण होणारी अराजकता आणि दुसरी त्या अराजकतेतून भविष्यवेधी साधावयाची संधी. संकटातून समस्या सोडविण्याचे खंबीर असे उपायही सापडत असतात. ही निरंतर प्रक्रिया आहे. याच प्रक्रियेचा लाभ नाटकवाल्यांनी विशेषत: हौशी नाटकवाल्यांनी घेणे गरजेचे आहे. कारण, कोरोनाच्या महामारीने इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा जास्त प्रहार सांस्कृतिक क्षेत्रावर, विशेषत: नाट्य क्षेत्रावर झाला आहे. नाटकाच्या ओढीने नाटकवाले तयार होत असतात आणि नाटकच होणार नसेल तर नाटकवाले जगतील कसे, हा प्रश्न आता निर्माण झाले आहे.
कोरोनाचे संकट संपले नसले तरी तब्बल अडीच महिन्याच्या टाळेबंदीनंतर देण्यात आलेल्या शिथिलतेने जनजीवन पूर्वपदावर यायला लागले आहे. मनोरंजन, प्रबोधनाचा भाग असलेल्या नाट्य क्षेत्राकडे सामान्य माणूस ढुंकूनही बघणार नाही.
मात्र, नाट्य क्षेत्राच्या रोजगारावर जगणारे बरेच आहेत आणि नाट्य क्षेत्र उघडणार नसेल तर त्यांची प्रचंड आबाळ होणार आहे. अशा स्थितीत स्वत:ला नाटकवाल्यांचे पालक म्हणवून घेणारी नाट्य परिषद व अॅक्टिव्ह रंगकर्मींनी हेवेदावे विसरत सांघिक पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने नाट्य क्षेत्र पूर्वपदावर कसे येईल, नाटकांच्या तालमी कशा सुरू करता येतील आणि नाटकांच्या सादरीकरणासाठी काय करता येईल, याचा विचार करण्याची गरज आहे.
आम्हीही १०० रसिकांसोबत नाटक करू - नरेश गडेकर
ज्या प्रमाणे विवाह, मुंज आदी सोहळ्यांना ५० वºहाड्यांची परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे शासनाने नाटक सादर करण्यासाठी ५०-१०० रसिकांची परवानगी दिली तर नाटक सुरू होईल आणि रंगभूमीवर आलेली मरगळ दूर होईल. शिवाय, कोरोनाच्या धास्तीमुळे निर्माण झालेला निरुत्साह दूर करण्यासाठी जनसामान्यांमध्ये चैतन्य पसरेल. त्यासाठी शासनाने सभागृह खुले करावे. नाट्य रसिक सुज्ञ असल्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क वगैरे कोरोनाच्या ज्या मार्गदर्शिका आहेत त्यांचे पालन नक्कीच केले जाईल, अशी भावना अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
ओटीटी, ऑनलाईन हा पर्याय नाहीच!
कोरोनामुळे बऱ्याच चित्रपटांचे प्रदर्शन चित्रपटगृहांअभावी होऊ शकले नाही आणि पुढचे काही महिने ते शक्यही नाही. त्यामुळे त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा पर्याय शोधत चित्रपट प्रदर्शित करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातही नाट्य परिषदेची पुणे शाखा व कोथरूड येथील संवाद संस्थेने नाटकांचे आॅनलाईन प्रदर्शन करण्यासाठी नाट्यगृहे उघडी करण्याची मागणी स्थानिक प्रशासनाकडे केली आहे. मात्र, नाटक आॅनलाईन होणार असेल तर त्याला नाटक कसे म्हणावे? हा प्रश्न आहे.