प्रक्रियेविना शहर कचरामुक्त कसे होणार
By admin | Published: May 10, 2017 02:33 AM2017-05-10T02:33:47+5:302017-05-10T02:33:47+5:30
स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग आहे.
कचरा प्रकल्पाकडे दुर्लक्ष : कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग आहे. घराघरातून संकलित करण्यात येणाऱ्या कचऱ्याची १०० टक्के विल्हेवाट लावणे महापालिकेचे कर्तव्य आहे. म्हणूनच यासाठी बृहत् आराखडा (डीपीआर)तयार करण्यात आला होता. शहरातून दररोज संकलित करण्यात येणाऱ्या ११०० मेट्रिक टन कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाणार होती परंतु हा प्रकल्प रखडला. त्यामुळे प्रक्रियाच होत नसल्याने शहर कचरामुक्त कसे होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी मे. कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट या एजन्सीकडे सोपविण्यात आली आहे. यासाठी कचऱ्याचे विलगीकरण करण्यात येणार आहे. परंतु महापालिकेकडे घनकचऱ्यावर प्रकिया करण्याची सक्षम यंत्रणा नाही. हंजर प्रकल्प आहे. परंतु याची क्षमता जेमतेम २०० मेट्रिक टन आहे. उर्वरित ९०० मेट्रिक टन कचरा प्रक्रिया न करताच भांडेवाडी येथे साठविला जातो.
महापालिकेने २००९ मध्ये भांडेवाडी येथील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी हंजर बायोटेक कंपनीकडे सोपविली होती. यात करारानुसार ६०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया अपेक्षित होती. परंतु सध्या या प्रकल्पात जेमतेम २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे. या प्रकल्पाची क्षमता वाढण्याची शक्यता कमी आहे.
प्रकल्पाचा
प्रस्ताव रखडला
८०० मेट्रिक टन प्रतिदिन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने दोन वर्षापूर्वी निविदा मागिविल्या होत्या. परंतु एकच निविदा आली होती. या प्रकल्पाच्या वित्तीय बाबी तपासण्यात आल्या होत्या. परंतु पुढे हा प्रस्ताव थंड बस्त्यात पडला आहे. यामुळे नवीन आॅपरेटरची नियुक्ती रखडली आहे. त्यामुळे नवीन आॅपरेटरची नियुक्ती कधी होणार असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.
१०० टक्के
प्रक्रिया कधी होणार?
स्वच्छतेच्या यादीत नागपूर शहराचा क्रमांक घसरला आहे. याला अनेक कारणे आहेत. यात शहरातून संकलित करण्यात येणाऱ्या कचऱ्यावर १०० टक्के प्रक्रिया न होणे हेही यातील एक महत्त्वाचे कारण आहे. हंजर प्रकल्पाची क्षमता नसल्याने नवीन प्रकल्प तातडीने सुरू करणे अपेक्षित होते. परंतु प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही.