‘पूर्व नागपूर’मध्ये भाजपच्या होमपीचवर काँग्रेसचा लागणार कस
By योगेश पांडे | Published: June 19, 2024 11:59 PM2024-06-19T23:59:08+5:302024-06-19T23:59:25+5:30
संघटन बळकट करण्याची परीक्षा : भाजपचे विजयी चौकाराचे नियोजन, उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचेही प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०१४, २०१९ व २०२४ अशा सलग तीन लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वांत जास्त ‘लीड’ मिळवून देणारा मतदारसंघ असलेल्या पूर्व नागपुरात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हालचालींना सुरुवात झाली आहे. भाजपने येथून सलग तीनदा विजय मिळविला असल्याने यंदा चौकार मारण्याचे प्रयत्न आहेत; तर दुसरीकडे काँग्रेससमोर मात्र संघटन बळकट करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे भाजपच्या या होमपीचवर काँग्रेसचा चांगलाच कस लागणार आहे.
या मतदारसंघातील विविध आर्थिक पातळीवरील मतदार असून जातीय समीकरणांमध्येदेखील वैविध्य आहे. ‘स्मार्ट सिटी’चा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या पूर्व नागपुरात मूलभूत समस्या कायम आहेत. अशा स्थितीत पूर्व नागपुरात यंदाही मतदार भाजपवरच विश्वास टाकणार की काँग्रेसच्या पारड्यात मते जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पूर्व नागपुरातील वर्धमाननगर, देशपांडे ले-आउट व आजूबाजूच्या परिसरात धनाढ्यांची वस्ती आहे. बहुतांश मोठ्या व्यापाऱ्यांसह अगदी अरबोपती मतदारदेखील येथे राहतात. दुसरीकडे नंदनवन, एचबी टाउन, पारडी आदी वस्त्यांमध्ये मध्यवर्गीय मतदारांची लक्षणीय संख्या आहे. तर याच मतदारसंघातील अनेक वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्या असून गरीब मतदारदेखील राहतात. गुजराती, मारवाडी मतदारांसोबतच तेली, मुस्लिम मतदारांचीदेखील येथे लक्षणीय संख्या आहे. सर्वच वर्गांतील नागरिकांचा मतदारसंघ अशी याची ओळख आहे. या मतदारसंघात हिंदी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याची जाण राजकीय पक्षांना आहे. त्यामुळे त्यादृष्टीने नियोजन करण्यावर भर राहणार आहे.
भाजपच्या मतांमध्ये सातत्याने घट, तरी प्रभाव कायम
भाजपने तीनवेळा येथून विजय मिळविला असला तरी २००९ सालापासून सातत्याने मतांमध्ये घट होत आहे. २००९ मध्ये खोपडे यांना ५५.१५ टक्के मते मिळाली होती. २०१४ मध्ये हा आकडा ५३.७३ टक्केंवर आला तर मागील निवडणुकीत त्यांना ५२.३५ टक्के मते मिळाली होती.
खोपडे, कुकडेंवर भाजपची मदार
भाजपचा प्रचाराचा किल्ला आ. कृष्णा खोपडे व शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी सांभाळला आहे. मागील १० वर्षांत या मतदारसंघात सर्वाधिक विकास प्रकल्प मंजूर झाले. या मतदारसंघात ‘मेट्रो’ची कनेक्टिव्हिटीदेखील आली व ‘स्मार्ट सिटी’च्या कामाला याच मतदारसंघातून सुरुवात झाली. येथील विकासकामांच्या भरवशावरच भाजपकडून लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यात आला होता. भाजपकडून उमेदवारीसाठी खोपडे यांचेच नाव आघाडीवर आहे. जर भाजपने तरुण चेहरा देण्याचे ठरविले तर कुकडे यांना संधी मिळू शकते. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे आभा पांडे यांचे नाव समोर केले जाऊ शकते.
काँग्रेसकडून अनेकजण इच्छुक
मागील विधानसभा निवडणुकीत अभिजित वंजारी यांनी २०१४ मध्ये येथून लढत दिली होती. सद्यस्थितीत ते विधान परिषदेचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. पूर्व नागपुरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव अतुल कोटेचा हेदेखील सक्रिय आहेत. तरुण नेतृत्व म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. मागील निवडणुकीतील उमेदवार पुरुषोत्तम हजारे यांच्यासह उमाकांत अग्निहोत्री, संगीता तलमले हेदेखील इच्छुकांच्या यादीत आहेत. गेल्या तीन निवडणुकीत काँग्रेस येथे पराभूत होत आली. त्यामुळे ही जागा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला सोडावी अशी मागणी समोर येत आहे. माजी गटनेते दूनेश्वर पेठे हे येथून तुतारी वाजविण्यासाठी इच्छुक आहेत. तर पूर्व नागपुरात तेली समाजाचा चेहरा म्हणून काँग्रेसकडून ऐनवेळी माजी महापौर शेखर सावरबांधे यांचे नाव समोर केले जाऊ शकते.
विधानसभेतील आकडेवारी
२००९
उमेदवार - पक्ष - मते
कृष्णा खोपडे - भाजप - ८८,८१४
सतीश चतुर्वेदी - काँग्रेस - ५३,५९८
जी. एम. खान - बसपा - ५,२५२
मामा धोटे - मनसे - ३,१९६
अनिल पांडे - सपा - १,८३५
२०१४
उमेदवार - पक्ष - मते
कृष्णा खोपडे - भाजप - ९९,१३६
अभिजीत वंजारी - काँग्रेस - ५०,५२२
दिलीप रंगारी - बसपा - १२,१६४
दुनेश्वर पेठे - राष्ट्रवादी - ८,०६१
अजय दलाल - शिवसेना - ७,४८१
२०१९
उमेदवार - पक्ष - मते
कृष्णा खोपडे - भाजप - १,०३,९९२
पुरुषोत्तम हजारे - काँग्रेस - ७९,९७५
सागर लोखंडे - बसपा - ५,२८४
मंगलमूर्ती सोनकुसरे - वंचित - ४,३३८
नोटा - ३,४६