कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कसा करणार सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:06 AM2021-05-30T04:06:52+5:302021-05-30T04:06:52+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाचा तिसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक लहान मुले प्रभावित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, गरीब व ...
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाचा तिसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक लहान मुले प्रभावित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, गरीब व सामान्य रुग्णांसाठी आधार असलेल्या नागपूर जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात बालरोग तज्ज्ञांची ‘अ’ व ‘ब’ गट मिळून ३० पदे मंजूर असताना केवळ १५ पदे भरली आहेत. तब्बल ५० टक्के पदे रिक्त आहेत. यामुळे तिसरी लाट आलीच तर बालकांवर उपचार कोण करणार?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान लहान मुले व कुमारवयीन मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण फारसे नव्हते. परंतु, दुसऱ्या लाटेत १९ वर्षांपर्यंतच्या वयोगटात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून आले आहे. जानेवारी महिन्यात ९०३, फेब्रुवारी महिन्यात १७४१, मार्च महिन्यात ६९६६, तर एप्रिल महिन्यात २०८१० असे एकूण ३०,४२० मुले बाधित झाली आहेत. या चार महिन्यांत नागपूर जिल्ह्यात २,८४,०२० कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यानुसार १०.७१ टक्के लहान मुलांना संसर्ग झाला आहे. यातच कोरोना विषाणूचे होत असलेले ‘म्युटेशन’, लसीकरणापासून दूर असलेली मुले व कोरोना प्रतिबंधक नियमांचे मुलांकडून योग्य पद्धतीने पालन होत नसल्याने कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. यामुळे बालरोग तज्ज्ञांची रिक्त पदे भरणे गरजेचे असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-बालरोग तज्ज्ञांची पदे वाढविण्याची गरज
तज्ज्ञांच्या मते, ग्रामीण भागातील लोकसंख्या मागील २५ वर्षांत वाढली आहे. त्या तुलनेत केवळ बालरोग तज्ज्ञाची केवळ ३० पदे फार कमी होतात. त्यातही ५० टक्के पदे रिक्त असणे हे बालरोगाच्या रुग्णावर अन्याय करण्यासारखे आहे. लोकसंख्येच्या आधारावर बालरोग तज्ज्ञांची पदे वाढविण्याची व रिक्त पदे भरण्याची आवश्यकता आहे. अन्यथा तिसरी लाट आल्यास पालकांना आपल्या लहान मुलांना घेऊन शहराची वाट धरावी लागणार आहे.
-शहरात ३००, तर ग्रामीणमध्ये ३० खासगी डॉक्टर
नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये जवळपास ३०, तर शहरात ३०० बालरोग तज्ज्ञ खासगी प्रॅक्टिस करतात. यावरून ग्रामीण भागातील स्थिती गंभीर असल्याचे दिसून येते. यातही बहुसंख्य खासगी डॉक्टर तालुकास्थळी प्रॅक्टिस करतात. यामुळे गावपातळीवर किंवा दुर्गम भागातील बालरोगाच्या रुग्णांना सेवा द्यायची असेल तर शासकीय रुग्णालयात बालरोग तज्ज्ञांची पदे वाढविणे व रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे आहे.
-डॉ. विजय धोटे, अध्यक्ष अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स
-तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभाग सज्ज
कोरोनाचा तिसऱ्या लाटेसाठी ग्रामीण आरोग्य विभाग सज्ज होत आहे. तालुकास्तरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतरित केले जात आहे. उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेड उभारले जात आहे. ‘एनआरएचएम’मधून बालरोग तज्ज्ञांचीही पदे भरण्याचे प्रस्तावित आहे. लागणाऱ्या औषधांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
-डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, नागपूर
- शासकीय रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांची स्थिती
::मंजूर पदे : ३०
:: रिक्त पदे : १५
= बालकांमध्ये कोरोनाची वाढती संख्या
::जानेवारी : ९०३ रुग्ण
:: फेब्रुवारी १७४१रुग्ण
:: मार्च ६९६६ रुग्ण
:: एप्रिल २०८१० रुग्ण