आपत्ती व्यवस्थापन विभाग संकटाशी कसा लढणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:06 AM2021-06-30T04:06:44+5:302021-06-30T04:06:44+5:30

अग्निमन विभागात ७० टक्के पदे रिक्त : दर महिन्याला सेवानिवृत्तांची भर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नैसर्गिक आपत्ती असो ...

How will the disaster management department deal with the crisis? | आपत्ती व्यवस्थापन विभाग संकटाशी कसा लढणार?

आपत्ती व्यवस्थापन विभाग संकटाशी कसा लढणार?

Next

अग्निमन विभागात ७० टक्के पदे रिक्त : दर महिन्याला सेवानिवृत्तांची भर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नैसर्गिक आपत्ती असो वा आगीची घटना घडल्यास अशा संकटकाळात महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी व अधिकारी बचावासाठी तत्पर असतात. परंतु सध्या अग्निशमन विभाग मोठ्या संकटाचा सामना करीत आहे. विभागात ७० टक्के पदे रिक्त आहेत. त्यात दर महिन्याला तीन ते चार कर्मचारी व अधिकारी सेवानिवृत्त होत असल्याने, रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कार्यरत कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कामाचा भार वाढला आहे. अशा परिस्थितीत मोठी घटना घडल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

पावसाळ्याच्या दिवसात आपत्ती व्यवस्थापन विभागाला २४ तास सतर्क राहावे लागते. पूर परिस्थिती निर्माण झाली. वस्त्यात पाणी साचले वा घरात पाणी शिरले तर हाच विभाग मदतीसाठी धावून येतो. असे असतानाही विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता, जुलै २०१९ मध्ये ५६ ड्रायव्हर, पाच फिटर व एका इलेक्ट्रिशियनची भरती करण्यात आली. ही भरती केली नसती तर परिस्थिती अधिकच बिकट झाली असती.

.....

शासन मंजुरीची प्रतीक्षा

नागपूर महापालिकेतील सेवा प्रवेश नियमात बदल करून भरतीला मंजुरी देण्याचा प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. परंतु शासनाने आपला आस्थापना खर्च किती आहे, याची माहिती मागितली. याचे उत्तर पाठविल्यानंतर शासनाकडून भरतीला मंजुरी मिळण्याची आशा आहे.

राजेंद्र उचके, मुख्य अग्निशमन अधिकारी मनपा

......

कंत्राटी कर्मचारी ठेवण्याचा पर्याय

कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे अग्निशमन विभागाला समस्यांचा सामना करावा लागत आहे. काही महिन्यापूर्वी कंत्राट पद्धतीवर १०० कर्मचारी नियुक्त करण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु अद्याप त्यावरही निर्णय झालेला नाही.

.......

अशी आहेत रिक्त पदे

नऊ अग्निशमन केंद्र (फायर स्टेशन), आपत्ती निवारण कक्ष, अग्निशमन प्रशिक्षण केंद्रासाठी ६११ कर्मचारी व अधिकाऱ्यांची गरज आहे. परंतु विभागात १८० कर्मचारी कार्यरत आहेत. म्हणजेच ७० टक्के पदे रिक्त आहेत. वास्तविक आकृतिबंधानुसार १३ फायर स्टेशनसाठी ८७२ पदे मंजूर आहेत. मुख्य अग्निशमन अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी यांची पदे रिक्त आहेत. अग्निशमन केंद्र अधिकारी या ११ पैकी १० सहायक अग्निशमन केंद्र अधिकाऱ्यांच्या ३० पैकी २६, उपअग्निशमन अधिकाऱ्यांच्या ३० पैकी २०, प्रमुख अग्निशमन विमोचकांच्या ५६ पैकी २०, ड्रायव्हर-ऑपरेटरच्या ११२ पैकी ४३, वहन चालकांच्या ७ पैकी ७, अग्निशमन विमोचकाच्या ३४६ पैकी २८५, मुख्य मेकॅनिक १ पैकी १, फिटर कम ड्रायव्हरच्या १० पैकी ४ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे दर महिन्याला निवृत्त होणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांची यात भर पडत आहे.

Web Title: How will the disaster management department deal with the crisis?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.