कशी राहील गावात कायदा व सुव्यवस्था?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:12 AM2021-08-22T04:12:13+5:302021-08-22T04:12:13+5:30
चिचाळा : पोलीस पाटील हा पोलीस व गाव यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असतो. प्रत्येक छोट्या-मोठ्या समस्येचे निराकरण वा वाद ...
चिचाळा : पोलीस पाटील हा पोलीस व गाव यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असतो. प्रत्येक छोट्या-मोठ्या समस्येचे निराकरण वा वाद सोडविण्यासाठी पोलीस प्रत्येक वेळी गावात येऊ शकत नाही. ग्रामीण भागात पोलीस स्टेशन तालुक्याच्या ठिकाणी तर मोठ्या गावात चौकी असते. यामुळे गावातील विविध तंटे व समस्या पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचविण्यात पोलीस पाटील महत्त्वाची भूमिका वठवितात. भिवापूर तालुक्यात सध्या ७२ पोलीस पाटलांची गरज आहे. सध्या मात्र ४२ पोलीस पाटील कार्यरत आहेत. त्यामुळे ३० गावात पोलीस पाटलांची तातडीने नियुक्ती होणे आवश्यक आहे. या ३० ठिकाणी गावाशेजारील पोलीस पाटलावर अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. मात्र, काही ठिकाणचे अंतर जास्त असल्याने संबंधित पोलीस पाटलांना समन्वय ठेवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे संबंधित गावातील पोलीस पाटलांची रिक्त पदे तत्काळ भरून इतर पोलीस पाटलांवरील अतिरिक्त कामाचा ताण कमी करावा, अशी मागणी चिचाळा येथील पोलीस पाटील नागो डहारे यांनी केली आहे.