पंतप्रधान सगळीकडे कसे लक्ष देणार?; नगमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 10:44 AM2018-01-20T10:44:38+5:302018-01-20T10:45:19+5:30
अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणाकडे वळलेल्या नगमा यांनी नागपुरात एकीकडे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले, तर दुसरीकडे पंतप्रधानांबाबत सहानभुती दाखविणारे वक्तव्य करून सर्वांना आश्चर्यचकित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी काँग्रेस नेत्यांकडून सोडण्यात येत नाही. मात्र अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणाकडे वळलेल्या नगमा यांनी नागपुरात एकीकडे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले, तर दुसरीकडे पंतप्रधानांबाबत सहानभुती दाखविणारे वक्तव्य करून सर्वांना आश्चर्यचकित केले. समस्या सोडविण्यासाठी तरुणांनी व समाजाने पुढाकार घेतला पाहिजे. एकटे पंतप्रधान सगळीकडे कसे काय लक्ष देणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीस असलेल्या नगमा यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितदेखील बुचकळ्यात पडले होते. ‘रायसोनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट’तर्फे आयोजित पाचव्या राष्ट्रीय विद्यार्थी संसदेचे शुक्रवारी उद्घाटन झाले, यावेळी त्या बोलत होत्या.
जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला योगेश छाबरिया, मौलाना सय्यद कल्बे रशैद रिझवी, संजय उपाध्ये, ज्येष्ठ पत्रकार मनीष अवस्थी, तसेच रायसोनी समूहाचे अध्यक्ष सुनील रायसोनी प्रामुख्याने उपस्थित होते. गेल्या ७२ तासांपासून देशातील वातावरण तापलेले आहे. केंद्र शासनाकडून भगव्याच्या नावाखाली राजकारण करण्यात येत आहे. संसदेत विरोधी पक्षांना बोलण्याची संधी देण्यात येत नाही. त्यामुळे केशरी रंगाच्या संत्र्याचे शहर असलेल्या नागपुरात येताना मनात धाकधूक होती, असे नगमा म्हणाल्या. देशात आजच्या तारखेत महिला सुरक्षित नाहीत. भाजपाशासित हरियाणामध्ये लहान मुलींवर अत्याचार होत आहेत. त्यांना थांबविण्याऐवजी तेथील पोलीस अधिकारी बेजबाबदार वक्तव्य करत आहेत.
महिला आरक्षणाची आवश्यकता असून यासंदर्भात विधेयक लवकरात लवकर संमत करण्यासाठी केंद्रावर दबाव टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मौलाना सय्यद कल्बे रशैद रिझवी यांनी विद्यार्थ्यांना स्वत:वर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला. विद्यार्थ्यांनी हुशार होण्याऐवजी बुद्धिमान होण्यावर भर द्यावा, असेदेखील ते म्हणाले. यावेळी योगेश छाबरिया, डॉ.संजय उपाध्ये, मनीष अवस्थी यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. सुनील रायसोनी यांनी प्रास्ताविक केले, तर श्वेता शेलगावकर यांनी संचालन केले.
भाजपच्या राज्यांत ‘पद्मावत’वर बंदी का ?
अगोदर ‘पद्मावती’ असे नाव असलेल्या चित्रपटाला आता विरोधानंतर ‘पद्मावत’ म्हणून प्रदर्शित करण्यात येत आहे. या चित्रपटाला ‘सेंसॉर बोर्ड’नेदेखील हिरवी झेंडी दाखविली आहे. राजस्थानमध्ये या चित्रपटाला होणारा विरोध समजू शकतो. मात्र भाजपाशासित इतर राज्यांमध्येदेखील या चित्रपटाच्या प्रदर्शनाला तेथील प्रशासनाने बंदी आणली आहे किंवा तशी तयारी सुरू आहे. या चित्रपटावरून केंद्र सरकार व भाजपाकडून दुटप्पी भूमिका घेण्यात येत असल्याचा आरोप नगमा यांनी लावला.