सार्वजनिक ठिकाणी कसा होऊ देणार देह व्यापार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:12 AM2021-08-28T04:12:09+5:302021-08-28T04:12:09+5:30
- पोलीस-नागरिक मिळून गुन्हेगारांचा बंदोबस्त करणार; ड्रग, वाळूतस्करांवर कारवाईचे आश्वासन नागपूर : गंगा-जमुनाचा रेड लाईट परिसर सार्वजनिक क्षेत्रात येतो. ...
- पोलीस-नागरिक मिळून गुन्हेगारांचा बंदोबस्त करणार; ड्रग, वाळूतस्करांवर कारवाईचे आश्वासन
नागपूर : गंगा-जमुनाचा रेड लाईट परिसर सार्वजनिक क्षेत्रात येतो. देशाच्या कायद्यानुसार कोणत्याही सार्वजनिक परिसरातील २०० मीटर क्षेत्रात देहव्यापार केला जाऊ शकत नाही. गंगा-जमुनाच्या २०० मीटर परिसरात एक नव्हे तर आठ शाळा आहेत. तेथे पोलीस चौकीही आहे. अशा स्थितीत तेथे देहव्यापार होऊ देणे कसे शक्य आहे? असे उत्तर शुक्रवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी फेसबुक लाईव्हमध्ये नागरिकांना दिले.
फेसबुक लाईव्हदरम्यान अनेक नागरिकांनी गंगा-जमुनातील देहव्यापार बंद केल्यामुळे पोलीस आयुक्तांचे अभिनंदन केले. दरम्यान, नागरिकांच्या प्रश्नाचे उत्तर देताना पोलीस आयुक्त म्हणाले, या रेडलाईट परिसरात बाहेरील जिल्ह्यातून अल्पवयीन मुलींना आणून त्यांच्याकडून देहव्यापार करण्यात येतो. हे काम कोणत्याही सभ्य समाजाला काळिमा फासणारे आहे. अनेक नागरिक या अवैध धंद्यासाठी इमारतींचा वापर करतात. या इमारती आणि खोल्या, वसतिगृहे, दुकाने किंवा गोदामासाठी उपयोगात आणल्या जाऊ शकतात. एखाद्या वारांगनेला रोजगाराची गरज असल्यास पोलीस संबंधित इतर विभागांच्या मदतीने शक्य ती मदत करण्यास तयार आहेत; परंतु गंगा-जमुनात अनेक वर्षांपासून देहव्यापार करीत असल्याचे कारण सांगून अवैध धंद्यांना सूट दिली जाऊ शकत नाही. दरम्यान, नागरिकांनी शहराच्या विविध भागांत गांजा, ड्रगची विक्री आणि वाळूची तस्करी होत असल्याच्या तक्रारी केल्या. त्यावर पोलीस आयुक्तांनी ड्रगमाफिया आणि वाळूतस्करांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले. त्या काही नागरिकांनी इतवारी, गांधीबागमध्ये वाहतुकीची समस्या, अंबाझरीत हुक्का पार्लर, पाचपावली, भांडेवाडी, यशोधरानगर परिसरात अवैध धंदे सुरू असल्याची तक्रार केली. त्यावर आयुक्तांनी पोलिसांच्या आशीर्वादाने यापुढे कोणतेही अवैध धंदे होऊ देणार नसल्याचा दावा केला.
.........
गणेशोत्सवानंतर पोलीस भरती
काही युवकांनी पोलीस भरती परीक्षा प्रलंबित असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर आयुक्तांनी वर्ष २०१९ची पोलीस भरती प्रक्रिया गणेशोत्सवानंतर १० ऑक्टोबरपूर्वी करण्याचे आश्वासन दिले.
......
गुन्हेगार प्रवृत्तीच्या ऑटोचालकांचे परवाने रद्द करणार
काही नागरिकांनी, ऑटो व्यवसायात गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव होऊन त्यांच्या कारवाया वाढल्याची तक्रार केली. त्यावर पोलीस आयुक्तांनी ऑटोचालकांचे गुन्हेगारी रेकॉर्ड काढले असून, अशा ऑटोचालकांचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव देणार असल्याचे सांगितले. त्यासोबतच सामान्य ऑटोचालकांनी नागरिकांना चांगली वागणूक द्यावी, यासाठी त्यांचे समुपदेशन करण्याची तयारी दाखविली.
.............