ना प्रस्ताव, ना प्रयत्न.. नागपूर विद्यापीठाला १०० कोटींचा निधी मिळणार कसा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 14:06 IST2022-03-26T11:57:55+5:302022-03-26T14:06:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने वर्षभर विविध ...

ना प्रस्ताव, ना प्रयत्न.. नागपूर विद्यापीठाला १०० कोटींचा निधी मिळणार कसा ?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने वर्षभर विविध आयोजनाचा मानस असून, शंभर कोटींच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निश्चित झाले होते; परंतु विद्यापीठाने अद्यापही शासनाला प्रस्ताव पाठविण्याची तसदी घेतली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून इतकी चालढकल का करण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
१९२३ मध्ये स्थापन झालेल्या नागपूर विद्यापीठाच्या शतकपूर्ती वर्षाला ऑगस्टमध्ये सुरुवात होणार आहे. वर्षभरात विविध उपक्रम, परिषदा, मेळावे घेण्याचे ठरविण्यात आले आहे. यासाठी विशेष समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे. या वर्षासाठी राज्य शासनाकडे १०० कोटी रुपयांची मागणी करण्याचे ठरविण्यात आले. त्या संबंधात प्राधिकरण सदस्यांनी प्रस्तावदेखील तयार केला. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य व विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी यांनीदेखील याबाबत शासनासोबत पत्रव्यवहार केला; परंतु प्रशासनाने प्रस्ताव शासनाकडे पाठविलेलाच नाही. वंजारी यांनी विधान परिषदेतदेखील हा मुद्दा उपस्थित केला; परंतु शासनाला विद्यापीठाकडून कुठलाही प्रस्ताव आला नसल्याची बाब यावेळी समोर आली. जर शासनाला प्रस्तावच जाणार नाही, तर निधी मिळणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याशिवाय महोत्सव समितीचे प्रमुख विष्णू चांगदे यांनी विद्यापीठाला प्रस्तावही तयार करून दिला. मात्र, असे असतानाही कुलगुरूंनी शासनाला शंभर कोटींच्या निधीचा प्रस्तावच पाठवला नसल्याची माहिती समोर आली आहे. ॲड. वंजारी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान शंभर कोटींच्या निधीची मागणी विधान परिषदेत केली. यावेळी उत्तरादरम्यान विद्यापीठाकडून तसा प्रस्तावच आला नसल्याने निधी कसा द्यावा, असा उलट सवाल मंत्र्यांनी केला.