कशी होणार ‘व्हीआयपी’नेत्यांची सुरक्षा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:08 AM2021-07-07T04:08:37+5:302021-07-07T04:08:37+5:30

जगदीश जोशी नागपूर : स्पेशल प्रोटेक्शन युनिट (एसपीयू) मधील हवालदार प्रमोद मेरगुरवार याने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने आत्महत्या केल्यामुळे व्हीआयपी ...

How will VIP leaders be protected? | कशी होणार ‘व्हीआयपी’नेत्यांची सुरक्षा?

कशी होणार ‘व्हीआयपी’नेत्यांची सुरक्षा?

Next

जगदीश जोशी

नागपूर : स्पेशल प्रोटेक्शन युनिट (एसपीयू) मधील हवालदार प्रमोद मेरगुरवार याने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने आत्महत्या केल्यामुळे व्हीआयपी नेत्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. व्हाईट फंगसमुळे डोळा गमावलेल्या प्रमोदला सहजरीत्या एसपीयू अधिकाऱ्यांनी नोकरीवर रुजू करून सर्व्हिस रिव्हॉल्व्हर दिली, त्यामुळे व्हीआयपी नेत्यांच्या सुरक्षेला काही महत्त्व दिले जात नसल्याचे उघड झाले असून सत्यस्थिती पुढे आल्यानंतर एसपीयू आपला बचाव करण्यात गुंतले आहे.

मुख्यमंत्री, राज्यपाल, कॅबिनेट मंत्र्यांसह दहशतवाद्यांपासून धोका असलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीयूकडे आहे. मागील काही वर्षांपासून नागपुरात व्हीआयपी व्यक्तींची संख्या वाढल्यामुळे एसपीयू युनिटचे महत्त्व खूप वाढले आहे. ज्यांची शरीरयष्टी, मानसिक स्थिती चांगली आहे अशाच अधिकारी, कर्मचाऱ्यांना एसपीयूत सामील करून घेतले जाते. याच कारणामुळे एसपीयूच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुण्याच्या महाराष्ट्र इंटेलिजन्स अ‍ॅकेडमी (एमआयए) मध्ये एका महिन्याचे कठीण प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणात शरीर मजबूत ठेवणे तसेच कठीण परिस्थितीत मानसिक संतुलन योग्य ठेवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. याशिवाय डोळ्यावर पट्टी बांधून पापणी बंद होताच गोळी झाडून हल्लेखोराला मारण्याचे किंवा व्हीआयपी नेत्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. त्याची रंगीत तालीमही करवून घेण्यात येते. एसपीयू अधिकारी, कर्मचाऱ्यांचा स्तर तपासण्यासाठी सहा-सहा महिन्यांच्या अंतराने रिफ्रेशमेंट कोर्सचेही आयोजन करण्यात येते. एवढे सगळे होऊनही घडलेले ताजे प्रकरण एसपीयूची सद्यस्थिती कळण्यासाठी पुरेसे आहे. सूत्रांनुसार, एमआयएच्या प्रशिक्षणात निष्काळजीपणा बाळगण्यात येतो. तैनात झाल्यानंतर खूप दिवसांनी प्रशिक्षण मिळत नाही. तसेच प्रशिक्षणात अनुत्तीर्ण झाल्यानंतर पुन्हा प्रशिक्षण देण्यासाठी विलंब लावण्यात येतो. तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवडीतही गुणवत्तेकडे लक्ष देण्यात येत नाही. येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठी संख्या शहर किंवा ग्रामीण पोलिसातून येते. पोलीस ठाण्यात कामाचा खूप ताण असतो. या ताणापासून सुटका करून घेण्यासाठी अनेकजण एसपीयू किंवा बीडीडीएस (बॉम्ब शोधक व नाशक पथक) मध्ये ड्युटी लावून घेतात. तैनात झाल्यानंतर ते अधिकाऱ्यांना खूश करतात. यामुळे योग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना एसपीयूत स्थान मिळत नाही. एसपीयूचे नागपूर युनिट रस्ते अपघातांमुळेही चर्चेत राहिले आहे. त्यात अनेक कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. त्यानंतरही एसपीयूला आधुनिक वाहन मिळत नाहीत. व्हीआयपी नेत्यांची वाहने १०० पेक्षा अधिक वेगाने धावतात. परंतु एसपीयूची वाहने ७० ते ८० किलोमीटरच्या वेगापेक्षा अधिक धावू शकत नाहीत. त्यामुळे व्हीआयपींच्या दौऱ्यात एसपीयू टीम अनेकदा अपघातग्रस्त झाल्या आहेत.

.........

दिल्लीतही टीम तैनात

राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीच्या दौऱ्यावर जातात. त्यामुळे एसपीयूची एक टीम दिल्लीत तैनात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कधीतरी दिल्लीला जातात. प्रोटोकॉलनुसार त्यांना दिल्ली पोलिसांची सुरक्षा मिळते. परंतु एसपीयूची टीम नावापुरती काम करते. अनेक वर्षांपासून ही टीम दिल्लीत आहे.

............

Web Title: How will VIP leaders be protected?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.