रुग्णवाहिकेतील रुग्णास कसे मिळाले असते उपचार ? ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:08 AM2021-02-07T04:08:08+5:302021-02-07T04:08:08+5:30
महापालिकेने रस्त्यावर कसे लावले लोखंडाचे खांब ? ऑन द स्पॉट फहिम खान नागपूर : वायुसेनेची एक रुग्णवाहिका शनिवारी दुपारी ...
महापालिकेने रस्त्यावर कसे लावले लोखंडाचे खांब ?
ऑन द स्पॉट
फहिम खान
नागपूर : वायुसेनेची एक रुग्णवाहिका शनिवारी दुपारी नागपूर महानगरपालिकेच्या दाभा परिसरात पोहोचली. या परिसरात महापालिकेतर्फे अनेक मार्गावर अवजड वाहनांना रोखण्यासाठी लोखंडाचे खांब लावण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णवाहिकेच्या चालकास वाहन चालविताना त्रास झाला. त्याने स्थानिक नागरिकांना रस्ता विचारणे सुरु केले. अखेर दुसऱ्या मार्गाने स्थानिक युवकांनी त्यास मुख्य मार्गापर्यंत पोहोचविले. दाभा परिसरातील या घटनेत रुग्णवाहिकेत गंभीर रुग्ण असता किंवा त्या परिसरातील गंभीर रुग्णास नेण्यासाठी रुग्णवाहिका आली असती तर आपात्कालीन स्थितीत रुग्णावर उपचार करणे कसे शक्य झाले असते, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
कोणत्या नियमानुसार लावलेत खांब ?
शहराच्या अनेक भागात असेच चित्र पाहावयास मिळते. अनेक ठिकाणी तर स्थानिक नगरसेवकांना सोबत घेऊन नागरिकांनी आपल्या मनाने रस्त्यावर लोखंडाचे खांब लावले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या परवानगी शिवाय शहरात कुठेही असे खांब लावण्यात येऊ नयेत अशी भूमिका महापालिकेने घेणे आवश्यक आहे. कारण आपात्कालीन स्थितीत अग्निशमन वाहने, रुग्णवाहिका पोहोचण्यासाठी अडचण येऊ शकते.
अग्निशमन वाहने कशी पोहोचणार?
शहरातील रहिवासी परिसरात रस्त्यांवर वाहनांना रोखण्यासाठी रस्त्याच्या मध्ये लोखंडाचे खांब लावण्यात येत आहेत. त्यामुळे एखादी आगीची घटना घडल्यास अग्निशमन विभागाची वाहने या रस्त्यावरून आग विझविण्यासाठी कशी जातील, हे सुद्धा महानगरपालिकेने सांगण्याची गरज आहे.
..............