अशी घेता येईल तुमच्या घरातील दिव्यांगजनांची काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 04:41 PM2020-05-20T16:41:52+5:302020-05-20T16:42:42+5:30
आपल्या घरातील व जवळपास असलेल्या दिव्यांगजनांची लॉकडाऊनच्या काळात कशी काळजी घेता येईल व त्यांचे मनोस्वास्थ्य अधिक चांगले कसे राखता येईल याचाच विचार त्यांचे पालक करत असतात. अशा पालकांसाठी काही महत्त्वाच्या व उपयुक्त योजना वा कृती पुढीलप्रमाणे सुचविता येऊ शकतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कोविड १९ विषाणूच्या संक्रमण काळात शासनाने सर्वत्र लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे सर्वत्र शाळा महाविद्यालय विद्यापीठ व इतर शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था बंद ठेवल्या आहेत. सामान्य मुलांसोबतच दिव्यांगजन मुलेही घरात अडकून पडलेली दिसत आहेत. जिथे सामान्यजनच कोंडीत अडकल्यासारखे झाले आहेत तिथे दिव्यांगजनांबाबत काय बोलायचे.. त्यांच्यासाठी हा काळ तर अधिकच कठीण असा होतो आहे.
आपल्या घरातील व जवळपास असलेल्या दिव्यांगजनांची लॉकडाऊनच्या काळात कशी काळजी घेता येईल व त्यांचे मनोस्वास्थ्य अधिक चांगले कसे राखता येईल याचाच विचार त्यांचे पालक करत असतात. अशा पालकांसाठी काही महत्त्वाच्या व उपयुक्त योजना वा कृती पुढीलप्रमाणे सुचविता येऊ शकतात.
लॉकडाऊनमुळे दिव्यांगजनांच्या दैनंदिन जीवनात फार मोठा परिणाम होतो. यामुळे एकाकीपण नैराश्य उदासीनता चिंता आणि भीती मानसिक ताण-तणाव निर्माण होऊन गंभीर परिणाम होऊ शकतात. दिव्यांगजनांकडे सामान्यांच्या तुलनेत फावला किंवा रिकामा वेळ जास्त असतो. या वेळेचा जर छंद आणि मनोरंजनासाठी उपयोग केल्यास अनावश्यक परिस्थितीमुळे निर्माण झालेला मानसिक ताण कमी होऊन सुदृढ मानसिक अस्वस्थता निर्माण होऊ शकते.
यासाठी लॉकडाऊन काळात दिव्यांगजनांना कार्यमग्न ठेवणे गरजेचे आहे. मनोरंजन क्रियेचा थेरपी म्हणून उपयोग करणे गरजेचे आहे. या वेळामध्ये दैनंदिन कामकाजात व्यतिरिक्त मिळणारा वेळ असतो. पालकांनी पुढील खेळांसाठी वा कार्यासाठी मुलांना प्रोत्साहित करावे.
यात घरात राहून खेळावयाचे खेळ मोडतात. जसे, मुलांना विविध प्राणी व फळांच्या कृती पुस्तिका तयार करता येतील. त्याचसोबत ठोकळे वा ब्लॉक्सचा वापर करून इमारती बनवणे वा वस्तू बनवता येतील. यासाठी घरगुती वस्तूंचाही वापर केला जाऊ शकतो. जसे, प्लास्टिकचे रिकामे डबे, रिकामी खोकी आदी. यानंतर कार गेम्स, पझल्स, शब्दकोडी, अंताक्षरी, भेंड्या खेळणे आदी खेळांतही त्यांना सामील करता येऊ शकते. यातून त्यांच्यातील सामाजिकता व मानसिकता मजबूत होईल. कधी सापशिडी, कॅरम, व्यापार आदी बुद्धीला चालना देणारे खेळ खेळले जाऊ शकतात. त्यातून मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळू शकेल. मुलांना सतत टीव्ही समोर बसू देणे चुकीचे ठरते. त्यांना जुनी मासिके, वर्तमानपत्रे यातील गोष्टी वाचायला द्याव्यात. आपण स्वत:ही त्यांच्यासोबत त्याचे वाचन करावे. त्यांना लहान मुलांचे कॉमिक्स, कथा कविता वाचायला देता येतील.
सुटीच्या काळात मुलांमधील सृजनशीलता वाढवण्यासाठी त्यांना रोजच्या घरगुती कामात सामील करून घ्यावे. घरातील स्वच्छता, स्वयंपाक किंवा अन्य आवराआवर यात त्यांची मदत घ्यावी. यातून त्यांच्यातील हस्तकौशल्य सुधारेल व त्यांचा आत्मविश्वासही वाढीस लागेल. त्यांना लहानसहान कामे स्वतंत्ररित्या करू द्यावीत. जसे, सरबत बनवणे, चहा बनवणे, झाडांना पाणी देणे आदी. यासाठी त्यांचे एक वेळापत्रकही बनवता येऊ शकते. या वेळापत्रकानुसार त्यांचा दिनक्रम राहिला तर त्यांनाही ते एक आव्हान वाटेल व दिवस कंटाळवाणा होणार नाही.