दातृत्वाचा असाही आदर्श!
By admin | Published: November 13, 2014 12:55 AM2014-11-13T00:55:50+5:302014-11-13T00:55:50+5:30
मनमिळावू, सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या जवळच्या व्यक्तीचे अचानक निधन झाले तर हसत्याखेळत्या कुटुंबावर अक्षरश: वज्राघातच होतो. यातून सावरणे मोठमोठ्यांना फार अवघड जाते.
मृत प्राध्यापिकेच्या कुटुंबीयांचा पुढाकार
नागपूर : मनमिळावू, सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या जवळच्या व्यक्तीचे अचानक निधन झाले तर हसत्याखेळत्या कुटुंबावर अक्षरश: वज्राघातच होतो. यातून सावरणे मोठमोठ्यांना फार अवघड जाते. परंतु या परिस्थितीतदेखील समाजाप्रति आपण काहीतरी देणे लागतो ही भावना जपणाऱ्या व्यक्ती व कुटुंब फारच थोडी. सुरेंद्रनगर येथील दामोदर ले-आऊट येथील रहिवासी चंद्रकांत झोटिंग यांच्या पत्नी दीपाली यांचे अल्प आजाराने बुधवारी निधन झाले. परंतु खचून न जाता झोटिंग कुटुंबीयांनी त्यांचे नेत्रदान व किडनीदान करण्याचा निर्णय घेतला व समाजासमोर प्रेरणादायी आदर्श प्रस्थापित केला.
दीपाली झोटिंग या रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. करिअरसोबतच त्यांचे घराकडेदेखील पूर्ण लक्ष राहायचे व कुटुंबातील सर्वांना काय हवे, काय नको याची त्या काळजी घ्यायच्या. समाजकार्यातदेखील त्या अग्रेसर असायच्या. सर्वकाही सुरळीतपणे सुरू असताना अचानक काही दिवसांअगोदर त्यांना ‘ब्रेनस्ट्रोक’ झाला. त्यांच्या मेंदूला होणारा रक्तपुरवठा जवळपास बंद झाला होता. अनेक दिवस ‘व्हेंटीलेटर’वर काढल्यावर अखेर डॉक्टरांनी आज त्यांना मृत घोषित केले.
त्यांचे पती, आठ वर्षीय मुलगा आर्यन, आई-वडील व इतर कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. दु:खावेग अनावर होत असतानादेखील चंद्रकांत झोटिंग यांनी मनाशी निश्चय केला. पत्नी जरी जगातून निघून गेली असली तरी तिचे नेत्र व किडनी यामुळे गरजवंतांच्या आयुष्यात प्रकाश येईल, या भावनेतून त्यांनी दीपाली झोटिंग यांचे नेत्र व किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली.
कुटुंबीयांनीदेखील त्यांना होकार दिला. त्यांच्या या निर्णयामुळे तीन रुग्णांना लाभ होणार आहे. सर्व वैद्यकीय प्रक्रिया आटोपल्यानंतर दीपाली झोटिंग यांच्या पार्थिवावर १३ नोव्हेंबर रोजी सहकारनगर घाट येथे दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.(प्रतिनिधी)