नागपुरात ओमायक्रॉनचा शिरकाव, मुख्यमंत्री कोविड मदतनिधीचा ओघ मात्र घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 07:00 AM2021-12-14T07:00:00+5:302021-12-14T07:00:02+5:30
Nagpur News कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे चिंता वाढली असताना, दुसरीकडे मुख्यमंत्री कोविड मदतनिधीत समाजातून येणारा ओघ प्रचंड कमी झाला आहे.
योगेश पांडे
नागपूर : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे चिंता वाढली असताना, दुसरीकडे मुख्यमंत्री कोविड मदतनिधीत समाजातून येणारा ओघ प्रचंड कमी झाला आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत तर नोव्हेंबरमधील दानदात्यांची संख्या अवघी ०.९० टक्के इतकी आहे. याशिवाय मुख्यमंत्री मदतनिधी व मुख्यमंत्री कृषी मदतनिधीकडे देखील दात्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
कोरोनाचे संकट लक्षात घेता, मुख्यमंत्री कोविड मदतनिधीची स्थापना केली व जनतेने त्यात सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत या मदतनिधीत मोठ्या प्रमाणात मदत आली होती. २०२१ मध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ३९ हजार ८७९ नागरिकांनी या निधीत मदत केली व यातून १९४ कोटी ९१ लाख रुपये जमा झाले. जानेवारी महिन्यात ३३१ जणांनी १ कोटी ५३ लाख रुपयांचे सहकार्य केले; तर ऑगस्टमध्ये दानदात्यांचा आकडा वाढून १९ हजार ७९ वर गेला व महिन्याभरात ८५ कोटी ६५ लाख रुपयांची रक्कम जमा झाली. मात्र, त्यानंतर मदतीचा ओघ घटत गेला. नोव्हेंबरच्या संपूर्ण महिन्यात दानदात्यांची संख्या घटून ६९ वर पोहोचली; तर मदतीचा आकडा ८० लाख ५ हजार इतकाच होता. ओमायक्रॉनमुळे तिसऱ्या लाटेची भीती वर्तविण्यात येत असताना मदतनिधीची संख्या घटत असल्याचे दिसून येत आहे.
कृषी मदतनिधीत केवळ ४४ जणांचे योगदान
शेतकऱ्यांना मुख्यमंत्री कृषी मदतनिधीच्या माध्यमातूनही मदत करण्यात येते. कोरोनाच्या कालावधीत या निधीत वर्षभरात ४४ जणांनी केवळ ४ लाख ५८ हजार रुपयांचे योगदान दिले.
मुख्यमंत्री मदतनिधीला मिळाले ५१ कोटी
नैसर्गिक संकट, वैद्यकीय उपचार यासारख्या विविध बाबींसाठी मुख्यमंत्री मदतनिधीतून पीडित जनतेला मदत करण्यात येते. या निधीत वर्षभरात ४ हजार १९१ लोकांनी मदत केली व यातून ५१ कोटी १० लाखांचा निधी गोळा झाला.